वाशिम : घरफोडीत साडेसहा लाखांचा ऐवज लंपास; ड्रीमलँड सिटीमधील घटना | पुढारी

वाशिम : घरफोडीत साडेसहा लाखांचा ऐवज लंपास; ड्रीमलँड सिटीमधील घटना

वाशिम : पुढारी वृत्तसेवा : शहरातील ड्रीमलँड सिटी परिसरात वास्तव्यास असलेले माजी बांधकाम सभापती (नगर परिषद, वाशीम ) गौतम सोनोने यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले रोख ३ लाख ८५ हजार व २ लाख ५० हजार रुपये मूल्य असलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना रविवारी (दि. २१ जानेवारी ) रोजी संध्याकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

ड्रीमलँड सिटीमध्ये वास्तव्यास असलेले गौतम सोनोने आणि त्याचे कुटुंबिय २० जानेवारीला महत्वाच्या कामानिमित्त अकोला येथे घराला कुलूप लावून गेले होते. अज्ञात चोरट्यानी घरावर पाळत ठेऊन रात्रीच्या सुमारास मुख्य दरवाजा व सुरक्षा ग्रील असे दोन्ही कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील लॉकरचे कुलूप तोडून त्यामधील रोख ३ लाख ८५ हजार व सोन्याचे दागिने ज्याची अंदाजे किंमत २ लाख ५० हजार असा एकूण साडेसहा लाख रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला.

सोनोने अकोला येथून आपले कौटुंबिक कामकाज आटोपून रविवारी (दि. २१ जानेवारी ) ला संध्याकाळी ७.३० वाजता परत आले. घराचे गेट उघडून आतमध्ये प्रवेश केला असता मुख्य दरवाजा व ग्रीलचे दोन्ही कुलूप तुटलेले दिसले. गौतम आणि त्यांची पत्नी अनिता यांनी घरामध्ये प्रवेश करून बघितले असता बेडरूममधील कपाट तोडून त्यातील साहित्य बाहेर काढून बेडवर अस्ताव्यस्त ठेवलेले आढळून आले. कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने त्यामधून लंपास केल्याचे लक्षात येताच शहर पोलिस स्टेशनला माहिती दिली.

ठाणेदार गजानन धंदर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पुष्पलता वाघ, प्रशांत वाढणकर, उमेश देशमुख, डॉग स्कॉड, फिंगर प्रिंटचे संदीप सरोदे व पथक, डिटेक्शन ब्रांचचे पोलिस उपनिरीक्षक सचिन गोखले, जमादार श्रीवास्तव, रामकृष्ण नागरे, महादेव भिमटे, उमेश चव्हाण, राहुल चव्हाण यांचा समावेश असलेला पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी रात्री उशिरा अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

“ती” रक्कम पगार अणि पेट्रोल पंपची

माजी बांधकाम सभापती गौतम सोनोने हे सध्या त्यांच्या बहिणीचा असलेला मालेगाव रोडवरील नायरा पेट्रोल पंपचे काम बघतात. पेट्रोल विक्रीमधून आलेली दोन दिवसाची ३.५० लाख रुपये रोख रक्कम होती. तर त्यांच्या पत्नी अनिता या एका खासगी शाळेवर अध्यापनाचे कार्य करतात. त्याचा त्यांना ३५ हजार रुपये पगार मिळाला होता. अशी एकूण ३.८५ लाख रोख रक्कम त्यांनी कपाटात ठेवली होती.

बंद घरातच होतात चोऱ्या

अलीकडच्या काळात बंद घर असले की, चोरटे त्यावर पाळत ठेवून घरात प्रवेश करतात आणि ऐवज लंपास करतात. विनायक नगरमध्ये मागील महिन्यात पत्रकार अभिजित संगवई अणि पोलिस कर्मचारी संतोष चव्हाण हे दोन्ही कुटुंब घर बंद करून बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी या दोन्ही घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेचा अद्याप तपास लागला नाही. परंतु, सर्व नागरिकांनी बाहेरगावी जाताना घरात कुणीतरी जवळच्या व्यक्ती ठेवून बाहेरगावी जावे. घराला कुलूप नसले तर चोरटे अशा घरात प्रवेश करत नाहीत. नागरिकांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिस प्रशासन नेहमी करत असते. परंतु, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. ही खेदाची बाब आहे.

Back to top button