यशोमती ठाकूर : महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट पूर्वनियोजित | पुढारी

यशोमती ठाकूर : महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट पूर्वनियोजित

अमरावती; पुढारी वृत्तसेवा

अमरावती जिल्ह्यात १२ आणि १३ नोव्हेंबरला झालेली दंगल आणि हिंसाचाराच्या घटना या पूर्वनियोजित होत्या, असा धक्कादायक दावा अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

अमरावती जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांसंबंधी भाजपा नेत्यांनी याप्रकरणी पोलिसांसमोर समर्पण केल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. अमरावतीमध्ये गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. अशा पद्धतीची माहिती आणि अहवाल नोडल एजन्सी असलेल्या सायबर विभागाने दिला आहे. या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय विखारी पोस्ट आणि प्रचार दोन्ही बाजूंच्या कट्टरवादी विचारांच्या लोकांमार्फत करण्यात आला असे सायबर विभागाच्या अहवालावरून दिसून येते. यामुळे ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा कोणाला होईल हे स्पष्टच आहे. अशी पुस्तीही ठाकूर यांनी जोडली.

दरम्यान सायबर विभागाने दिलेल्या अहवालानुसार 12 व 13 नोव्हेंबर ला #AmravatiVoilence हा हॅशटॅग वापरुन अवघ्या काही मिनिटांतच चार हजार ट्विट्स तसेच पोस्ट करण्यात आलेत तसेच ट्विटर,फेसबुक आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून केलेल्या पोस्ट ह्या अत्यंत भडक आणि भावना भडकवणाऱ्या होत्या. तर त्या सोबत जोडण्यात आलेल्या चित्रफिती ह्या चुकीची माहिती देऊन विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणाऱ्या होत्या. त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे चुकीचे वर्णन करून तेढ निर्माण करणाऱ्या या पोस्ट ताबडतोब काढून टाकाव्यात अशा सूचना सायबर विभागाने दिल्या आहेत. मात्र या सर्व प्रकारांमध्ये जनतेच्या धार्मिक भावना भडकवून महाराष्ट्रात असंतोष निर्माण करुन अस्थिरता निर्माण करावी आणि त्याचा फायदा मतांचे ध्रुवीकरणसाठी करावा यासाठी हा सर्व पूर्वनियोजित कट होता असा दावा अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

१२ व १३ नोव्हेंबर रोजी घडलेल्या हिंसाचारामागे दोन्ही बाजुंच्या कट्टरवादी गटांचा एकत्रितरित्या समावेश होता तसेच या माध्यमातुन नेमका कुणाला फायदा होणार हे जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे हे उल्लेखनीय आहे.
– ॲड. यशोमती ठाकूर, पालकमंत्री

हे ही वाचलं का? 

Back to top button