Buldana : 'त्या' बॅंकेची पारदर्शकता दिसली अन् किरीट सोमय्यांनी परिषद आटोपती घेतली | पुढारी

Buldana : 'त्या' बॅंकेची पारदर्शकता दिसली अन् किरीट सोमय्यांनी परिषद आटोपती घेतली

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा

बुलडाणा (Buldana) अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीतील घोटाळे सापडतील आणि आपण सीबीआय, ईडीला माहिती देऊ… त्यानंतर त्यांच्यावरही चौकशा सुरू होतील, अशा अपेक्षेने बुलडाणा दौऱ्यावर गेलेल्या किरीट सोमय्यांना बॅंकेची पारदर्शकता दिसल्यानंतर आपली पत्रकार परिषद आटोपती घेतली. बॅंकेवर टीका करण्यासारखं काही उपलब्धच झाले नसल्याने सोमय्यांनी भाष्य करण्याचं टाळलं.

नांदेड जिल्ह्यातील एका मंत्र्यांच्या साखर कारखान्यांना बुलडाणा (Buldana) अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीने कर्जे दिली आहेत. या व्यवहाराचे अनुषंगाने महाविकास आघाडीतील या मंत्र्याच्या काही बेनामी ठेवी असल्याच्या शंकेने प्राप्तीकर खात्याचे पथकाने दिवाळीपूर्वी सलग सहा दिवस बुलडाणा अर्बनच्या धर्माबाद (जि. नांदेड) शाखेची तपासणी केली असता 1200 बचत खाती ही केवायसी पूर्ततेशिवाय उघडलेली असल्याचे आढळल्याने प्राप्तीकर पथकाने या 1200 संशयित खात्यातील 53 कोटींच्या ठेवी  गोठवल्या आहेत.

मंत्री अशोक चव्हाणांवर आरोप करायला किरीट सोमय्या यांनी संधी हेरली. सोमय्यांनी दिल्ली गाठून इडी, प्राप्तीकर विभाग व  सहकार खात्यातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन बुलडाणा दौऱ्यावर 12 नोव्हेंबरला येण्याची वातावरण निर्मिती केली. त्यानुसार मोठ्या तडफेने ते आज शुक्रवारला बुलडाण्यात आले. आणि ‘बुलडाणा अर्बन’च्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष राधेशाम चांडक आणि सीएमडी डाॅ. सुकेश झंवर यांना भेटले. तासाभराच्या या चर्चेत चांडक व झंवर यांनी संस्थेचा ताळेबंद दाखवून पारदर्शकतेचा दावा केला.

धर्माबाद शाखेतील खात्यांची केवायसी पुर्तता तातडीने करून घेत असल्याचे सांगितले. स्थापनेपासून म्हणजेच सलग 38 वर्षापासून संस्थेचा ऑडिट वर्ग ‘अ’असल्याचे सांगितले. १० हजार कोटींहून अधिक बचतठेवी असून बुलडाणा अर्बन ही आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था असल्याचे सांगितले.

या भेटीनंतर भाजपा कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद झाली. किरीट सोमय्या काय बोलणार, याविषयी सर्वांनाच उत्कंठा होती. त्यांच्या सवयीप्रमाणे ते काही बेधडक बोलतील असे वाटणारांचा आडाखा चुकला. सुरूवातीला भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र अभियानाची इकडची तिकडची उदाहरणे देत राज्यात इडीच्या सुरू असलेल्या कारवायांची  त्यांनी माहिती दिली. बुलडाणा अर्बन कार्यालयातील भेटीत ‘राजकीय भ्रष्टाचाऱ्यांना साथ देऊ नका, तपास यंत्रणांना सहकार्य करा’, असे  सांगून सोमय्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले आणि पत्रकार परिषद आटोपती घेतली. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष आ. आकाश फुंडकर, सरचिटणीस योगेंद्र गोडे उपस्थित होते.

Back to top button