तोंडीच मागण्या मान्य होत्या मग ओबीसी बैठकीचा फार्स कशाला? विजय वडेट्टीवार यांचा सवाल  | पुढारी

तोंडीच मागण्या मान्य होत्या मग ओबीसी बैठकीचा फार्स कशाला? विजय वडेट्टीवार यांचा सवाल 

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी समाजाच्या मागण्या तोंडींच जर  मान्य करायच्या होत्या तर मग बैठक कशाला घेतली, राज्य सरकारचा देखील हा फार्स होता, यामुळेच मी आणि अनेक आमदार गेलो नाही. तोंडी आश्वासनावर तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने  केले, लेखीशिवाय माघार नाही म्हणणारे ओबीसी नेते  तोंडी आश्वासनावर  कसे काय समाधानी झाले असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
जळगावमध्ये कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली, एकंदर आरक्षण संपवण्याचा घाट सुरू आहे, चपराशी पासून इंजिनिअरपर्यंत संपूर्ण जागा कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत.मनुवादी लोक मोक्याच्या जागी आणून आरक्षण संपवले जाईल, या जीआरची होळी करा. ओबीसी एससी एसटी हा संपूर्ण  कॅटेगिरीचा हक्क संपवणारा आहे. तरुणांनो रस्त्यावर उतरा, सत्ताधाऱ्यांना गावात येऊ देऊ नका, हा जीआर बहुजनांना उध्वस्त करणारा आहे.  धनगर आरक्षणाचा काय तोडगा निघाला माहित नाही, सरकार मूर्ख बनवत आहे. रामाच्या नावावर निवडणुकासमोर  वेगवेगळे  उपद्व्याप सुरू आहेत.  भाजपसोबत सत्तेत असणारे पक्ष हे निवडणूक आयोग खिशात घेऊन फिरत असल्यासारखे वागत आहेत. दोन लोक जरी भाजप बरोबर जातील ,पक्ष आणि चिन्हाचा दावा केला तरी त्यांना मिळेल.  उद्या सहा महिने मुख्यमंत्री, तीन महिने उपमुख्यमंत्री आणि एक महिना मंत्री असेही कंत्राटी पद्धतीने भरली जातील,  बोगस ओबीसी प्रमाणपत्र आधारे नोकऱ्या बळकावणा ऱ्यांवर कारवाई करा, जाती निहाय जनगणना करा.  शिंदे गटाचे विरोधात जाणार असल्याने  निकाल लागत नाही, जीवनदान देण्याचं काम सुरू आहे. आता उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयातच न्याय मिळेल.  8 लक्ष कोटींच कर्ज आहे, रोखे काढून कर्ज काढण्याचे काम सुरू आहे, पाच महिने निराधाराना पैसे न देणारे सरकार आहे. अजितदादावर निशाणा !
माल कमवत जायचे, नाराज असल्याचे दाखवायचे ढोंग सुरू आहे असा अप्रत्यक्षपणे अजितदादावर निशाणा साधला. हे तीन पक्षाचे गोंधळी असून जनतेला  खडा तमाशा दाखवू नका, कसली नाराजी, सारे राजकारण आहे, शिंदे सरकारचा बळी घ्यायची तयारी झाली आहे या दोघांची, गणेश विसर्जन झाले आता सरकार विसर्जनतयारी सुरू आहे. वेळीच निकाल लागला असता तर हे चित्र दिसले नसते, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

Back to top button