चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : कोरपना तालुक्यातील उपरवाही येथे अंबुजा सिमेंट कंपनीच्या प्रकल्पग्रस्तानी जर कंपनीमध्ये काम मिळाले नाही तर मंत्रालयात जावून विष प्राशन करु असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामूळे एकतर कामाला हात द्या नाहीतर संपादित करण्यात आलेल्या जमिनी परत करा, असे म्हणत शेतकरी आक्रमक झाले आहेत.
याबाबत अधिकची माहिती अशी की, कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपननीकरिता परिसरातील शेकडो हेक्टर जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, कंपनीने भूसंपादन करारात शेतकऱ्यांच्या हिताच्या केलेल्या अटीशर्तीचे उल्लंघन केल्याने अनेक प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित आहेत. प्रकल्प ग्रस्थांची शेतीही गेली आणि नोकरीही नाही, अशी अनेकांची स्थिती निर्माण झाली आहे. प्रकल्प ग्रस्थांमध्ये आता संताप पसरला आहे. एक तर नोकरी द्या, अन्यथा जमीन परत करा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. प्रकल्पग्रस्त एवढ्यावरच थांबले नाही तर नोकरी किंवा जमीन मिळाल्या नाही तर मंत्रालयात विष प्राशन करू असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी पत्रकार परिषदेला संजय मोरे, तुषार निखाडे, प्रवीण मटाले, अविनाश विधाते, सचिन पिंपळशेंडे, शंभू नैताम, निखिल भोजेकर, कमलेश मेश्राम, विष्णू कुमरे आदी उपस्थित होते.