चिखलामध्ये फसलेल भाजप सरकार, घरी जायची वेळ आल्याने घर चलो अभियान : नाना पटोले | पुढारी

चिखलामध्ये फसलेल भाजप सरकार, घरी जायची वेळ आल्याने घर चलो अभियान : नाना पटोले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजपवर आता सर्व बाजूने घरी जाण्याची वेळ आल्याने भाजप घर चलो अभियान राबवत आहे. चिखलामध्ये फसलेलं हे महाराष्ट्राचे सरकार आहे. भ्रष्टाचारी लोक बाहेर येतील. शेतकऱ्यांच्या जीवावर बेतलेले हे सरकार आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि. २०) नागपुरात माध्यमांशी बोलताना केला.

पटोले म्हणाले, सत्तेच्या आधारावर शेतकऱ्यांना बरबाद करायचे, एकंदरीत सिस्टिमॅटिक प्लॅनिंग सरकार कडून केले जात आहे. कांदा निर्यात दरवाढीच्या शेतकरी विरोधी निर्णयाचा आम्ही निषेध करतो.

दरम्यान, अजित पवार संदर्भात बोलताना पहिले ईडी सरकार होते, आता येड्यांचे सरकार आहे. महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावण्याचे काम या सरकारने केले आहे. एसटी महामंडळात अनेक बसेस खाजगी व्यक्तीकडून घेतल्या आहे. भ्रष्टाचार करून लूट करण्याचे काम येड्यांचं सरकार करत आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.

आजपासून विदर्भात सुरू झालेल्या अभियानाबाबत छेडले असता भाजपवर घरी वापस जाण्याची वेळ आली असल्याने भाजप घर चलो अभियान राबविण्यात येत आहे.

मविआच्या दृष्टीने मेरिटच्या आधारावर जागा वाटप होईल हे आम्ही बोललो होतो, तेच शिवसेना नेते संजय राऊत बोलले. आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदावर डोळा आहे, आमच्या मित्राचे लक्ष गृह खात्यापेक्षा व्यक्तिगत फायद्यासाठी त्याचा उपयोग सुरू आहे, मागील काळात गुजरातमध्ये असलेली हुकूमशाही महाराष्ट्रात सध्या निर्माण करत आहे, असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. सत्तेचा उपयोग महाराष्ट्राच्या जनतेसाठी व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. भुजबळ यांनी संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर बोलताना मला धर्मावर, जातीवर काही बोलायचे नाही असे पटोले म्हणाले.

चीन बद्दल देशाचे छप्पन इंच छातीचे पंतप्रधान फक्त घोषणा करत आहेत. देशाच्या सीमा सुरक्षित राहिलेल्या नाहीत. आज चीनच्या इशाऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चालत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राहुल गांधीचे मत खरे आहे.

एखादी बातमी विरोधात आली म्हणून एवढा विरोध भाजपने करायचे काही काम नाही. दुसऱ्याचे दुखणे दिसत नाही. स्वतःच्या डोळ्यात बोट गेल्यावर वेदना होतात. सगळ्या मीडिया आमच्या ताब्यात असल्यासारखे काम भाजप करत आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली.

Back to top button