विचारांनी जुळलेले कार्यकर्ते महत्वाचे, पक्षाच्या नदीतील इनकमिंगचा पूर फार काळ राहत नाही : गडकरी | पुढारी

विचारांनी जुळलेले कार्यकर्ते महत्वाचे, पक्षाच्या नदीतील इनकमिंगचा पूर फार काळ राहत नाही : गडकरी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आज पक्षाच्या नदीत इनकमिंगचा पूर आला आहे मात्र लक्षात ठेवा, नदीचा पूर जास्त दिवस राहत नाही. 25 टक्के लोक तुमच्या पक्षाशी विचाराने जोडलेले असतात तर 45 टक्के लोक केवळ सत्ता आहे म्हणून संधी साधून तुमच्याजवळ आलेले असतात. त्यामुळे पक्षावर मनापासून प्रेम करणारे जोडा, खासदार, मंत्री, आमदार माजी होतात मात्र कार्यकर्ता कधीही माजी होत नाही त्यांच्याकडे लक्ष द्या, त्याचवेळी विविध समाजाच्या आघाड्या करताना आज बरे वाटत असले तरी उद्या निवडणुकीत त्यांना संधी न मिळाल्यास उलट डोकेदुखी वाढल्याशिवाय राहणार नाही असा सबुरीचा सल्ला केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे पद्ग्रहण समारंभात आज ते मनमोकळेपणे बोलले.

गडकरी म्हणाले, आज ना उद्या निवडणुका होतील पण केवळ पंतप्रधान मोदींच्या नावावर नितीन गडकरी किंवा फडणवीस यांच्या नावावर तुम्हाला फार काळ सत्ता मिळवता येणार नाही, जनतेच्या हृदयात स्थान मिळवा, जनतेची कामे करा असा कानमंत्र त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. कार्यकर्ता महत्वाचा आहे. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखाशी समरस व्हा, कार्यकर्ता टिकला तरच पक्ष टिकेल, त्यामुळे सत्ता आहे म्हणून तुमच्या जवळ येणाऱ्यांच्या फार नादी लागू नका, जात, पंथ,धर्म याकडे लक्ष न देता पक्ष कार्यकर्त्यांच्या कामावर मोठा झाला पाहिजे. देशाच्या निर्मितीसाठी हे तत्त्व महत्त्वाचे आहे. समर्पित भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढवा, ते वाढले तरच राजकीयदृष्ट्या मोठे यश मिळेल असे गडकरी यांनी आपल्या राजकीय जीवनातील अनुभव, पक्षांतर्गत हेवेदावे ,अध्यक्ष म्हणून काम करताना आलेल्या अडचणी संदर्भात अनेक किस्से सांगितले.यावेळी विदर्भ विभागीय संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपा जिल्हा प्रभारी चैनसुख संचेती, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्यासह जिल्ह्यातील आजी,माजी आमदार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आजचा भाजपा हा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा झाला आहे. कामाचा आनंद घेण्यासाठी पदाची गरज नाही. अंत्योदयाच्या विचारातून समाजापर्यंत पोहचून कामे करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुतीचे सरकार जनकल्याणसाठी काम करीत आहे, येत्या काळात जिल्ह्यातील सर्व विधानसभांमध्ये भाजपा महायुतीचा झेंडा रोवण्याचा संकल्प करावा असे त्यांनी आवाहन केले. जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी पदाची जबाबदारी दिल्याबद्दल भाजपा नेतृत्त्वाचे आभार व्यक्त केले.

Back to top button