अमरावती : आंतरराज्यीय अट्टल सोनसाखळी चोर गजाआड; २.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती : आंतरराज्यीय अट्टल सोनसाखळी चोर गजाआड; २.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती; पुढारी वृत्तसेवा : पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने रविवार, २३ जुलै रोजी सायंकाळी एका आंतरराज्यीय अट्टल चेन स्नॅचर्सला अटक केली. संजय ब्रजमोहन चौकसे (४७, रा. तिल्लोर खुर्द, इंदौर, मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सोनसाखळी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून सोने व दुचाकी असा एकूण २ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील साईनगर येथील रहिवासी डॉ. शैलेश बन्सीलाल जयस्वाल (४१) हे १९ जुलै रोजी सकाळी आपल्या मुलीला शाळेत सोडून देण्यासाठी दुचाकीने जात असताना समर्थ शाळेजवळ मागून आलेल्या दुचाकीस्वार दोन लुटारूंनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी पळविली होती. या प्रकरणी शैलेश जयस्वाल यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. विशेष पथकही या गुन्ह्याच्या समांतर तपास करीत होते. तपासात सदर गुन्ह्यात संजय चौकसे याचा हाथ असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील ३ व इतर ठिकाणी २ असे एकूण ५ गुन्हे त्याचा सहकारी रजत अग्रवाल याच्या मदतीने केल्याची कबुली पथकाला दिली.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ३७ ग्रॅम २४० मिली सोने तसेच दुचाकी असा २ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई विशेष पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू, सुनील लासूरकर, विनय मोहोड, जहीर शेख, अतुल संभे, राहुल ढेंगेकर, विनोद काटकर, सागर ठाकरे यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news