चंद्रपूर : गडचिरोली जंगलातून वाघाची शिकार करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपूर : गडचिरोली जंगलातून वाघाची शिकार करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
Published on
Updated on
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली, चंद्रपुर तसेच तेलंगाणा राज्यात वाघांची शिकार करण्याचा परप्रांतीय टोळीचा मोठा कट उधळून लावण्यात आला आहे. आंबेशिवणी येथे विशेष कार्य दलाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयीत शिकाऱ्यांची टोळी ताब्यात घेतली.
राज्यभरातील व्याघ्र प्रकल्पात वाघांची शिकार होत असल्याची गुप्त माहिती केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोला मिळाली. ही शिकार रोखण्याकरिता राज्यभरातील व्याघ्र प्रकल्पात अलर्ट घोषीत केला होता. विशेष कार्यदल गठीत करून पाळत ठेवली असताना आज रविवारी (दि. २३) गडचिरोलीमध्ये वाघांची शिकार रोखण्याबाबत मोठी कारवाई पोलीस व वनविभागाने केली आहे. गडचिरोलीतील आंबेशिवणी येथून काही संशयीत महिला व पुरूषांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून वाघाची शिकार करण्याकरीता वापरण्या येणारे शिकंजे, धारधार शस्त्रे, वाघांची नखे व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहेत. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या अलर्टनंतर राज्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गडचिरोली, चंद्रपुर तसेच तेलंगाणा राज्यात वाघांची शिकार करण्याचा परप्रांतीय टोळीचा मोठा कट उधळून लावण्यात आला आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, २८ जून २०२३ रोजी गुवाहाटी, आसाम राज्य येथे पोलीस विभाग व वनविभाग आसाम यांचे संयुक्त कारवाईत वाघाच्या शिकार प्रकरणी हरियाणा राज्यातील तीन व्यक्तींना वाघाची कातडी व हाडांसह अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडुन मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो, नवी दिल्ली यांनी देशातील सर्व प्रमुख व्याघ्र प्रकल्पांच्या सभोवतालच्या क्षेत्रांकरीता वाघांच्या शिकारीची शक्यता असल्याची सुचना दुसऱ्याच दिवशी २९ जून  २०२३ रोजी दिली होती. या शिकार प्रकरणात चंद्रपूर व गडचिरोली वनक्षेत्रात शिकार झाल्याचा संशय असल्याने पडताळणी करण्याकरिता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांनी, तीन सदस्यीय पथक गुवाहाटी येथे रवाना केले होते.
पथकाने गुवाहाटी येथे कारागृहात असलेल्या आरोपींची चौकशी केली असता सदर शिकारी टोळीमधील काही महत्त्वाचे सदस्य गडचिरोली वनविभागाचे क्षेत्रात वावरत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोलीतील वनक्षेत्रात संशयीतांवर पोलीस विभागाच्या मदतीने गुप्त पाळत ठेवण्यात आली होती. संशयीत शिकाऱ्यांना जेरबंद करण्याकरीता मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर वनवृत्त व गडचिरोली वनवृत्ताची एक संयुक्त चमू गठीत करण्यात आली.
आज (रविवारी, दि. २३) दुपारी दोन वाजता गडचिरोली जवळील आंबेशिवणी येथे स्थानिक पोलीसांच्या मदतीने छापा टाकण्यात आला. राहत्या झोपड्यांमध्ये वाघांच्या शिकारीकरीता वापरण्यात येणारे शिकंजे ६ नग, धारदार शस्त्रे, वाघांची ३ नखे व रु. ४६ हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली. या कारवाईत संशयीत ६ पुरुष, स्त्रीया व ५ लहान (मुले) यांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले.
संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे करीमनगर, तेलंगाणा व धुळे, महाराष्ट्र येथून देखील तेलंगणा वनविभाग व तेलंगणा पोलीसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यातील संशयीत हरियाणा व पंजाब या राज्यातील निवासी आहेत. या आरोपींचा आसाम येथे पकडण्यात आलेल्या शिकार प्रकरणी तसेच देशातील विविध भागांतील शिकार प्रकरणांत समावेश असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत उघड झाली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्याकरीता क्षेत्रसंचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व गडचिरोली वनवृत्तातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेली विशेष कार्य दल गठीत करण्यात आले आहे. तसेच सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली यांना तपास अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे.  प्राथमिक चौकशीअंती वरील सर्व संशयितांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील तरतुदीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.
ही कारवाई राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता यांचे मार्गदर्शनात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक ज्योती बॅनर्जी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक रमेशकुमार, चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक नीलोपन, उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक, उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे, उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक बापू येळे, सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सतिश शेंडे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सायबर सेलचे आकाश सारडा, मुकेश जावरकर, दिनेश केंद्रे व स्थानिक पोलीस अधिकारी यांनी ही कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news