हिंगोली : गोरेगाव परिसरात नदी ओढ्याला पूर | पुढारी

हिंगोली : गोरेगाव परिसरात नदी ओढ्याला पूर

गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह परिसरात संततधार पावसामुळे नदी नाल्याला पूर आला आहे. नदी काठच्या शेतात पाणी शिरल्याने शेतासह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जून महिना कोरडा गेला, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर पेरण्या झाल्या आहेत. गोरेगाव सह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अधुनमधून संततधार पाऊस पडत असल्यामुळे गोरेगाव येथील गौरी गंगा नदीला पूर आला आहे यामुळे नदीच्या काठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेतासह नुकत्याच उगवलेल्या पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कडोळी गोरेगाव मार्गावर असलेल्या आडबण शिवारातून वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी शेतात शिरल्याने शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर सततच्या पावसामुळे छोटे मोठे तलाव तुडुंब भरल्याने भुगर्भात पाणी साठा वाढला आहे. यामुळे बोअर, विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी साठा वाढला आहे. संततधार पावसामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत असले तरी काही शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

Back to top button