यवतमाळ : भावाला थापड मारणाऱ्या युवकाचा भरचौकात खून

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : दारू व गांजाचे व्यसन जडलेल्या सराईत गुन्हेगाराने शुक्रवारी रात्री गोदाम फैल भागात युवकाला शिवीगाळ करून कानशिलात लगावली. ही बाब त्या युवकाने घरी भाऊ व वडिलांना सांगितली. याचा बदला घेण्यासाठी पूर्ण परिवार रस्त्यावर आला. सहा जणांनी स्टेट बँक चौक गाठले. त्या ठिकाणी थापड मारणारा आढळताच सहा जण त्याच्यावर तुटून पडले व बेदम मारहाण केली. तसेच चाकूने सपासप वार केले. यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. या गुन्ह्यातील सहा आरोपींना शहर पोलिसांनी घटनेनंतर काही तासांतच अटक केली.
चेतन बाबाराव चित्रीव (२५, रा. यवतमाळ) असे मृत युवकाचे नाव आहे. चेतन हा काही महिन्यांपूर्वी गोदाम फैल परिसरात राहत होता. चेतनवर अनेक गंभीर गुन्हे आहेत. चांदूर रेल्वे येथे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. चेतन नेहमीच गुन्हेगारांसोबत राहत होता. शुक्रवारी चेतन गोदाम फैल भागात फिरत असताना त्याला सुमित सोनटक्के दिसला. चेतनने त्याला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत सुमितच्या कानशिलात लावली.
त्यानंतर चेतन तेथून निघून गेला. सुमितने घरी जावून आपबीती सांगितली. यामुळे सोनटक्के परिवार संतापला, चेतनचा बंदोबस्त करण्यासाठी राजेश भाऊराव सोनटक्के (४९), विनोद मधुकरराव सोनटक्के (४८), रोहित गजानन सोनटक्के (२३), सुमित विनोद सोनटक्के (१९) यांच्यासह विधी संघर्षग्रस्त इतर दोन मूल चेतनच्या शोधात निघाले. त्यांनी गणेश चौकात चेतनचा जावई अजय डोमाळे याच्या भाजीपाला दुकानासमोर गोंधळ घातला, शिवीगाळ केली.नंतर ते सर्व स्टेट बँक चौक येथे पोहोचले. त्या ठिकाणी चेतन एका मित्रासोबत दारू दुकानाबाहेर उभा होता. तेथे वाद घालत थेट चेतनवर हल्ला चढविला. चाकूने हातावर पोटात, पाठीत, छातीवर वार केले. चेतन जागेवरच कोसळला, त्याचा मित्र तेथून पसार झाला.दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच अजय डोमाळे यांनी घटनास्थळ गाठून चेतनला अनोळखी मदतीने दुचाकीवरून शासकीय रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी चेतनला मृत घोषित केले. उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक संजय आत्राम, जमादार प्रदीप नाईकवाडे, मिलिंद दरेकर, अंकुश फेंडर, किरण पडघन, संतोष व्यास, भरत राठोड, चिंतामण दाभेकर यांनी आरोपींना अटक केली. गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक शशिकिरण नौकार यांच्याकडे देण्यात आला. आरोपीतील चौघांना न्यायालयात हजर केले असता १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली विधिसंघर्षग्रस्त आहे. दोन बालकांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.