चिखलदरा येथून सात ते आठ किमी अंतरावर शनिवारी (दि. १६) रात्री नऊ वाजताच्या दरम्यान एका वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. त्यामध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते. चिखलदरा ते धामणगाव रस्त्यावरील हरी अमराई पॉइंट येथे पर्यटन महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बिबट्याच्या अपघाती मृत्यूची घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. वाहन चालक तेथून पळून गेला असता, तरी सीसीटीव्हीच्या मदतीने अज्ञात वाहनाचा तपास केल्या जात आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून पर्यटक परिसरात भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत. त्यामुळे अशाप्रकारे भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्यांवर पोलीस अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी, जेणेकरून असे अपघात टाळता येतील, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.