फडणवीसांचा आशिष देशमुखांना शब्द, ”आम्ही योग्य संधी देऊ”

फडणवीसांचा आशिष देशमुखांना शब्द, ”आम्ही योग्य संधी देऊ”
Published on
Updated on
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आपला माणूस आपल्या परिवारात आला. डॉ. आशिष देशमुख यांच्यासारखा तरुण, तडफदार आणि राजकारणाची समज असलेला नेता स्वगृही परत आला, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. देशमुखांचे आज भाजपमध्ये स्वागत केले. तुम्ही मी लढणार नाही हे सांगण्याची हिंमत केली. काळजी करू नका, आम्ही योग्य संधी देऊ, आता कुठेही जाण्याची वेळच येणार नाही असा शब्द त्यांनी देशमुख यांना दिला. दुसरीकडे 2024 साली लोकसभा, विधानसभा निवडणूक लढणार नाही असे जाहीर करत विदर्भात फिरणार, ओबीसी संघटित करणार, नानागिरी, काकागिरी, दादागिरी संपवू, 20-25  आमदार वाढविण्यासाठी काम करू अशी ग्वाही भाजप प्रवेशानंतर डॉ. आशिष देशमुख यांनी दिली.
कोराडीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या डॉ. आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेश सोहळ्यात फडणवीस बोलत होते.  ते म्हणाले, ज्यावेळी राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अवमान केला आणि न्यायालयातही माफी मागण्यासाठी नकार दिला. त्यावेळी देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. तेव्हाच  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मी ठरवलं की त्यांना भाजपमध्ये परत आणले पाहिजे. डॉ. देशमुख यांना स्वगृही आणण्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे, ते सामान्य माणूस नाहीत, मोठे कलाकार आहेत. 2009 साली सावनेरमध्ये त्यांनी निवडणूक लढली. सुनील केदार यांच्या तोंडचे पाणी पळवले, थोडक्यात भाजपचा विजय हुकला. 2014 ला आम्ही आशिष देशमुखांना सांगितले तुम्ही काटोलला जाऊन लढले पाहिजे. अचानक दिलेला प्रस्तावही त्यांनी स्वीकारला. मोदींच्या नावाचा योग्य वापर, काकांची रणनीती भेदत त्यांनी विजय संपादन केला. परिवर्तनाचा नारा यशस्वी ठरविला.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनात घेतलेले निर्णय कधी बरोबर तर कधी कधी चुकतात. एकदा जीवनाची दिशा योग्य प्रकारे ठरवावी लागते. देशमुख यांच्यात नेतृत्व गुण आहेत, लोकांना जोडण्याची कला आहे. शिर्डीला जाऊन साईबाबांचा आशीर्वाद घेतला आता त्यांची श्रद्धा भाजपवर तर सबुरी स्वतःकडे आहे.
व्यासपीठावर डॉ. आशिष देशमुख, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये,  शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, माजी अध्यक्ष डॉ राजीव पोतदार, आमदार टेकचंद सावरकर, अशोक मानकर, माजी आमदार सुधाकर कोहळे. मिलिंद माने, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, किशोर रेवतकर, चरणसिंग ठाकूर, संदीप सरोदे, रमेश मानकर आदी प्रामुख्याने हजर होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news