नागपूर : साडेतीन वर्षाच्या मुलीचे अपहरण; ऑटोचालकाच्या सतर्कतेमुळे बचावली चिमुकली | पुढारी

नागपूर : साडेतीन वर्षाच्या मुलीचे अपहरण; ऑटोचालकाच्या सतर्कतेमुळे बचावली चिमुकली

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरातील इतवारी रेल्वे स्थानकातून शनिवारी (दि. १७) सकाळी एका व्यक्तीने साडेतीन वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने जीआरपीच्या पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांच्या नेतृत्वात नागपूर जीआरपीच्या चमूने केलेल्या कारवाईमुळे ही मुलगी या आरोपीच्या तावडीतून बचावली. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत हा आरोपी या चिमुकलीसह कैद झाला. यानंतरच्या तपासात एका ऑटोचालकाने पोलिसांना केलेल्या मदतीमुळेच हा आरोपी तातडीने पकडला जाऊ शकला.

मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालची रहिवासी असलेली ही साडेतीन वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत इतवारी रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट बघत होते. हे कुटुंब तिकीट काढतानाच संशयित आरोपी संधीच्या शोधात होता. दरम्यान चॉकलेटचे आमिष दाखवून या आरोपीने नजर चुकवून या मुलीचे अपहरण केले आणि तिला स्टेशनच्या बाहेर घेऊन निघून गेला. त्यांनतर तो बाहेर एका ऑटोचालकाच्या ऑटोत बसून नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्टेशनवर आला. ही मुलगी आरोपीकडे शांत असल्यामुळे अर्थातच कुणालाही त्याच्यावर संशय आला नाही. दरम्यान, थोड्याच वेळात पोलिसांनी मुलीचा शोध घेत असतांना ऑटोचालकांना तिचा फोटो दाखवताच आरोपी नागपूर स्टेशनला गेल्याचे कळले. या ठिकाणी ऑटो उभा असल्याची खात्री पटताच पोलिसांनी तात्काळ या आरोपीला प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरूनच मुलीसह ताब्यात घेतले.

ऑटोचालक मीर सरफराज अली यांच्या ऑटोमधूनच आरोपी नागपूर रेल्वे स्टेशनवर आला होता. रेल्वे पोलिसांच्या मते हा आरोपी मुलीला रायपूरला घेऊन जाणार असल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या पुढे आली. इतरही बेपत्ता मुलींच्यास तपासासाठी पोलीस या आरोपीची कसून चौकशी करीत आहेत.

Back to top button