

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली जिल्ह्यातील एका तालुक्यात आपले काम आटोपून संध्याकाळी घराकडे परत जाणाऱ्या एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपीस गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. मिथुन मडावी असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, कुठलेही धागेदोरे नसताना पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे.
२७ मे २०२३ रोजी संध्याकाळी पीडित महिला ही आपले काम आटोपून घरी जात होती. मिथुन मडावी याने तिला एकटे गाठून तिच्यावर अत्याचार केले. पीडितीने त्याला प्रतिकार करताना मिथूनने तिला जबर मारहाण केली. त्यानंतर महिलेने कसेबसे चामोर्शी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तिला गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात भरती केले. वैद्यकीय तपासणी करुन तिचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखा व चामोर्शी पोलिस ठाण्यातील पोलिसांची चार पथके तयार केली. पीडित महिला घाबरल्याने ती योग्य माहिती देण्यास सक्षम नव्हती. त्यानंतर महिला समुपदेशकाच्या मदतीने विश्वासात घेऊन तिला बोलते असता तिने आरोपीचे वर्णन सांगितले. त्यावरुन पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र जारी केले. त्यानंतर संबंधित परिसरात जाऊन सखोल चौकशी केली असता मिथुन मडावी नामक इसम फरार असल्याची माहिती मिळाली. शिवाय त्याचे वर्णनही रेखाचित्राची मिळतेजुळते असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी मिथुनचे नातेवाईक राहत असलेल्या परिसरात गोपनीय बातमीदारांचे जाळे तयार केले. तेव्हा मिथूनचा भाऊ चंद्रपूरला वास्तव्य करीत असल्याचे समजले. पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांशी संपर्क साधला. पुढे मिथुन मडावी हा चंद्रपूरला असल्याची खात्री पटल्यानंतर बुधवारी ७ जूनला मिथुनला ताब्यात घेण्यात आले.
गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता मिथूनने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला चामोर्शी पोलिस ठाण्याच्या चौकशी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांच्या ताब्यात देण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, चामोर्शीचे पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पाटील, उपनिरीक्षक राहुल आव्हाड, दीपक कुंभारे, पल्लवी वाघ, सुधीर साठे, पुरुषोत्तम वाडगुरे, दीपक लेनगुरे, श्रीकांत बोईना,सचिन घुबडे, अकबर पोयाम, प्रशांत गरफडे, श्रीकृष्ण परचाके, शगीर शेख, मनोहर टोगरवार, माणिक निसार आदींनी ही कारवाई केली.