नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सिमेंटची ऑनलाईन विक्री करण्याच्या नावावर लाखो रुपयांनी गंडा घालत फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. एका व्यक्तीची या प्रकरणी साडेतेरा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. अंबाझरी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात हिंगणा येथील प्रफुल्ल सोनकुसरे (वय ३७) या व्यक्तीने तक्रार दाखल केली होती.
सोनकुसरे यांच्या कंपनीला सिमेंटची गरज होती. त्यांनी ऑनलाईन सिमेंटसाठी ट्रेड इंडिया डॉटकॉम नावाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली. त्यानंतर सौरभ त्रिपाठी नावाच्या व्यक्तीने सोनकुसरे यांच्या कंपनीशी संपर्क साधला. कंपनीला सिमेंटच्या ५ हजार पोत्यांसाठी ऍडव्हान्स रकमेची मागणी करण्यात आली. त्यासाठी येस बँकेच्या अंधेरी शाखेतील खाते क्रमांक देण्यात आला. यानंतर सोनकुसरे यांच्या कंपनीने संबंधीत बँक खात्यात साडेतेरा लाख रुपये जमा केले. पण सिमेंटचा पुरवठा मात्र झालाच नाही. त्याच बरोबर ऍडव्हान्स म्हणून दिलेली रक्कम देखील परत मिळाली नाही. अखेर सोनकुसरे यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आयपीसीच्या ४१९, ४२० व सहकलम ६६(सी) अन्वये आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.