चंद्रपूर : भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने ११ जनावरे चिरडली; ७ ठार, ४ जखमी | पुढारी

चंद्रपूर : भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने ११ जनावरे चिरडली; ७ ठार, ४ जखमी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राजुरा तालुक्यात भरधाव ट्रकने रस्त्याने जात असलेल्या ११ जनावरांना चिरडल्याची घटना घडली. यामध्ये ७ जनावरे ठार झाली असून ४ जखमी झाली आहेत. पाटण गडचांदुर मार्गावरील सोनापूर फाट्यावर शुक्रवारी (दि. २) दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोनापूर फाट्यावर बराच वेळ रस्ता रोको केल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर आमदारांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आला.

राजुरा तालुक्यातील सोनापूर फाट्यालगतच्या पाटण मार्गे गडचांदुरकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. एम एच 34 बी जी 9975) समोरून येणाऱ्या जनावरांना धडक देत चिरडले. यामध्ये २ बैल, ४ गाई, एका वासराचा जागीच मृत्यू झाला. तर ४ बैल जखमी झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी बराच वेळ रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार सुभाष धोटे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक आणि पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तात्काळ पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व जनावरांचे पंचनामे केले. आमदार धोटे यांनी घटनास्थळी दाखल होत ट्रक मालकाला धारेवर धरत नुकसान भरपाईची मागणी केली.

नुकसानग्रस्त शेतकरी

नुकसानग्रस्त आशिष मडावी १ बैल, राजीव गेडाम १ गाय, सागर कन्नाके २ गाय, १ वासरू, विलास जगरवार १ गोरा , धर्मा किन्नाके, नागू वेडमे, विशेषराव अत्राम, विठ्ठल अचालवार यांना ट्रक मालकाने तातडीची नुकसान भरपाई दिली. आमदार आणि स्थानिक लोकांनी ट्रक चालकाला धारेवर धरल्यामुळे ही नुकसान भरपाई मिळाली. तसेच या घटनेवर कारवाई करून शासनामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या प्रसंगी सरपंच जगू येडमे, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, उप पोलिस निरीक्षक ओमप्रकाश गेडाम, सुधीर जाधव, पशुधन विकास अधिकारी नरसिंग तेलंग, संदिप राठोड, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी दीपक नागले, पशुधन परिवेक्षक धेंगडे, पोलिस पाटील संतोष सलाम, अनिल मडावी, नजू शेखसह शेतकरी उपस्थित होते.

Back to top button