नागपूर : ३ लाख विद्यार्थी, गणवेश मात्र नक्की नाही; पण पहिल्याच दिवशी पुस्तके | पुढारी

नागपूर : ३ लाख विद्यार्थी, गणवेश मात्र नक्की नाही; पण पहिल्याच दिवशी पुस्तके

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : २६ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरु होत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, मनपा, खासगी, अनुदानित व जिल्हा परिषदेच्या या शाळांमधील 3 लाख विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. परंतु पाठ्यपुस्तके पहिल्याच दिवशी मिळणार हे निश्चित झाले आहे. यंदा ‘एकात्मिक पाठ्यपुस्तके योजनेअंतर्गत सर्व विषयांकरिता एकच पुस्तक राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी होणार आहे.

शासनाच्या समग्र शिक्षा अभियानअंतर्गत दरवर्षी १ ली ते ८ वीच्या मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि सेमी इंग्रजी माध्यमांच्या मुलांना मोफत पुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या हाती मोफत पुस्तके मिळावीत. मुलांची गैरसोय होऊ नये यासाठी जि.प. शिक्षण विभागाकडून गत जानेवारी महिन्यापासूनच नियोजन करुन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे पुस्तकासाठी ऑनलाईन नोंदणीही करण्यात आली. बालभारतीमार्फत पाठ्यपुस्तके पुरवठाही जिल्हास्तरावर झाला आहे. आता तालुकास्तरावर या पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरु झाले आहे. आजवर नागपूर (ग्रामीण), उमरेड, भिवापूर, कामठी आणि हिंगणा या तालुक्यांमध्ये पाठ्यपुस्तके मागणीनुसार पोहचली आहेत.

एका विद्यार्थ्याला चार पुस्तके

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत शासकीय, अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येते. पूर्वी विद्यार्थ्यांना इयत्ता १ ते ८ साठी त्यांना आवश्यक असलेल्या सर्व विषयांचे एक स्वतंत्र पाठ्यपुस्तक देण्यात येत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये त्या-त्या विषयांच्या पुस्तकांसोबतच वह्याही राहत असल्याने दप्तराचे ओझे वाढत होते. परंतु आता आगामी शैक्षणिक सत्रापासून यासर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून‘एकात्मिक पाठ्यपुस्तके योजनेतर्गत वर्षभरासाठी चारच पाठ्यपुस्तक देण्यात येणार आहे. यापैकी दोन पुस्तके हे दिवाळीपूर्वीच्या अभ्यासक्रमाचे आणि दोन पुस्तके हे दिवाळीनंतरच्या अभ्यासक्रमाचे राहणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चारही पुस्तकांचे वितरण होणार आहे.

Back to top button