HSC Result : बारावी बोर्ड परिक्षेत आनंदवनातील सर्व दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण

HSC Result : बारावी बोर्ड परिक्षेत आनंदवनातील सर्व दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वरोरा आनंदवनातील संधी निकेतन अंपगांची कर्मशाळेतीलल सर्व २७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत कर्मशाळेच्या शतप्रतिशत निकालाची परंपरा कायम राखली आहे.
महारोगी सेवा समिती वरोरा संचालित निजबल अंतर्गत  संधिनिकेतन अपंगांची कर्मशाला, आनंदवन येथे दिव्यांग व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बोर्डाच्या खाजगी विद्यार्थी परीक्षा योजने अंतर्गत (१७ नंबर फॉर्म) दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसविले जाते. सदर विद्यार्थ्यांना विनामूल्य निवासी सुविधेसह नियमित शिकवणी वर्ग ही घेतले जाते. यावर्षी  २१ कर्णबधिर व ६ अंध असे एकूण २७ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली .यात निखिल चुलाराम नागोशे या अंध विद्यार्थ्याने ६५ टक्के गुण मिळवित प्रथम स्थान पटकावले तर निलेश पारसकर या मूकबधिर विद्यार्थ्याने ६४.३३ टक्के गुण मिळवित सदर प्रवर्गात प्रथम क्रमांक घेतला.
व्यवस्थापकीय अधीक्षक रवींद्र नलगिंटवार यांचे नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात बारावी परीक्षा समन्वयक प्रवीण ताठे, आशीष येटे, नितीन आवरी, प्रीती पोहाने या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. परीक्षा व पूर्व तयारी करीता आनंद निकेतन महाविद्यालयांच्या उपप्राचार्या राधा सवाने, हिरालाल लोया विद्यालयाचे जोशी सर यांचे बहुमोल योगदान व मार्गदर्शन प्राप्त झाले. सदर यशा करीता संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, कार्यकारी विश्वस्त कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ,  मसेसचे विश्वस्त सुधाकर कडू , सदाशिव ताजने, माधव कवीश्वर,आनंदवन मित्र मंडळ वरोरा अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर सचिव राजेंद्र मर्दाने आदी मान्यवरांसह आनंदवन वासियानी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news