नागपूर : इंदोरा, शांतीनगर यूपीएचसीला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र; राज्यातील पहिले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र | पुढारी

नागपूर : इंदोरा, शांतीनगर यूपीएचसीला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र; राज्यातील पहिले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर महानगरपालिकेच्या इंदोरा आणि शांतीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी (यूपीएचसी) सर्वाधिक गुणांसह राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणिकरण (NQAS) प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे, मनपाची ही दोन्ही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र NQAS प्रमाणिकरण प्राप्त महाराष्ट्रातील पहिले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी अभिनंदन केले.

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम (NQAS) अंतर्गत प्रमाणित झालेल्या आरोग्य संस्थांचे निकाल आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, दिल्ली यांचेद्वारे जाहीर करण्यात आले. यामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने ८५.२ टक्के तर शांतीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने ८३ टक्के गुण मिळविले. एप्रिल २०२३ मध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, दिल्ली यांचेद्वारे नामनिर्देशित राष्ट्रीय स्तरीय मुल्यांकन अधिकारी यांनी मुल्यांकन केले होते. राष्ट्रीय स्तरावरील NQAS प्रमाणित झालेले महाराष्ट्रातील पहिले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून या दोन्ही सस्थांनी मान प्राप्त केलेला आहे. यापूर्वी एकही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे NQAS प्रमाणित झालेले नाही.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या नेतृत्वातील शहर स्तरीय गुणवत्ता आश्वासन चमूद्वारे २०२० पासून NQAS मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करून सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात आले.. शहर स्तरीय गुणवत्ता आश्वासन चमू मध्ये डॉ. विजय जोशी, डॉ. सरला लाड, डॉ. अश्विनी निकम, डॉ. राजेश बुरे व श्री निलेश बाभरे यांचा समावेश असून NQAS तपासणी सूचीनुसार १२ थिमेटिक एरियानुसार अंमलबजावणी केली जाते. ज्यामध्ये माता व बाल संगोपन सेवा, बाह्यरुग्ण सेवा, लसीकरण, बाह्यसत्र, आपात्कालीन व ड्रेसिंग सेवा, कुटुंब कल्याण, प्रयोगशाळा, औषधी, संसर्गजन्य रोग नियंत्रण तसेच असंसर्गजन्य रोग नियंत्रण आणि सामान्य प्रशासन (ज्यामध्ये इमारत स्थिती, वस्त्र, आहार, रुग्ण कल्याण समिती इत्यादी) यांच्या दिलेल्या पूर्वनिर्धारित निकषानुसार मुल्यांकन केले जाते.

NQAS प्रमाणिकरण हे ३ वर्षाकरिता वैध असेल. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रतिवर्ष २ लक्ष रुपये अनुदान पारितोषिक म्हणून दिले जाते.

Back to top button