नागपूर : देशात लोकशाही नव्हे तर हुकुमशाही; आदित्य ठाकरे यांचा आरोप | पुढारी

नागपूर : देशात लोकशाही नव्हे तर हुकुमशाही; आदित्य ठाकरे यांचा आरोप

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज (दि. २२) नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पर्यावरण विषयक समस्यांवर बोलत असताना सत्ताधारी गटावर टीका केल्या. सरकारचा कारभार पाहता लोकशाही नव्हे तर हुकूमशाही सुरु आहे असा आरोप त्यांनी यावेळी.

ते म्हणाले की, कोराडीत प्रदूषणाचा गंभीर विषय आहे. पुन्हा राखेची साठवणूक सुरू होत आहे, कोल वॉशरीज विदर्भात वाढत चालली आहे, मी पर्यावरण मंत्री असतांना हे सर्व थांबवले होते, एकंदरीत सरकारचा कारभार पाहता लोकशाही नव्हे तर हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी गटाच्या कामावर ताशेरे ओढले.

नागपुरातील अजनीवनचा विषय गंभीर आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना शहरात मध्यभागी असलेल्या ऑक्सिजनचे भांडार अजनीवन तोडण्याला आम्ही स्थगिती दिली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोराडीतील सहा युनिट बंद करून 660 मेगावॅटचे दोन प्रकल्प आणण्यात येत आहेत. मुळात जे युनिट बंद होत आहे तिथे रोजगार जाणार आहेत त्यांचे काय? सगळे युनिट एकाच ठिकाणी आणून स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ चालला आहे. मतदार जे रहिवासी आहेत त्यांचे जीवन अधिक खालावणार आहे. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात नाहीत. कोल वॉशरीज वाढत आहेत. या संघर्षात आम्ही सोबत आहोत. जे सत्यासोबत उभे आहेत त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणा दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्दैवाने हा पॅटर्न सगळीकडे देशभरात दिसत आहे. एकप्रकारे देशात लोकशाही दिसत नसून हुकूमशाही सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार, हुकमशाही सरकार विरोधात लढा असणार आहे असेही ते म्हणाले.

Back to top button