नागपूर : आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय कायम; उद्योजक नरेंद्र जिचकार यांना चपराक | पुढारी

नागपूर : आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय कायम; उद्योजक नरेंद्र जिचकार यांना चपराक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथील अंबाझरी उद्यानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बेकायदेशीररित्या पाडल्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्याचा आदेशाविरोधातील याचिका जिल्हा सत्र न्यायाधिशांनी  खारिज केली आहे.

दि. २ मे रोजी अंबाझरी उद्यानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बेकायदेशीररित्या पाडणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी नागपूर यांनी अंबाझरी पोलिसांना दिले होते. या निर्णयाविरोधात गरुडा अम्यूजमेंट पार्क प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक उद्योजक नरेंद्र जिचकार यांनी जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल केली होती. तब्बल पाच दिवस युक्तिवाद चाललेल्या या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश नागूर यांनी आज निर्णय देत मुख्य न्यायदंडाधीकारी यांचा निर्णय कायम ठेवत याचिकाकर्ते जिचकार यांची याचिका खारिज केली.

राज्यभरात अतिशय लक्षवेधी ठरलेल्या या प्रकरणात आता अंबाझरी पोलीस गुन्हा नोंदविणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचिकाकर्ते जिचकार यांचेतर्फे अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल युक्तिवाद केला तर मुख्य याचिकाकर्ते राजेश गजघाटे यांचे वतीने अ‍ॅड.रोशन बागडे, अ‍ॅड. वैभव दहीवले, अ‍ॅड. लुबेश मेश्राम, अ‍ॅड. विलास राऊत, अ‍ॅड. सचिन मेकाले यांनी युक्तिवाद केला. यानिमित्ताने अखेर तक्रारकर्ते व याचिकाकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृती समितीचे संयोजक व आम आदमी पार्टीचे नेते राजेश गजघाटे यांच्यासह सर्व आंदोलकांचा विजय झाल्याचे म्हणता येईल. याप्रकरणी महिलांनीही मोठा लढा दिला हे विशेष.

Back to top button