गडकरी धमकी प्रकरण : एनआयएचे पथक लवकरच नागपुरात

NIA charge sheet on PFI
NIA charge sheet on PFI

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात १०० कोटींच्या खडणीसाठी धमकी प्रकरणातील कुख्यात जयेशच्या पुढील चौकशीसाठी एनआयएचे पथक लवकरच नागपुरात येणार असल्याची माहिती आहे. याबाबतीत आजवरचा तपासाचा नागपूर पोलिसांचा अहवाल लक्षात घेता एनआयएच्या तपासात अनेक सत्य बाहेर येण्याची शक्यता असून या तपासासाठी केंद्रीय गृह मंत्रालयकडूनही ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचे समजते.

जानेवारी, मार्चमधील धमकी प्रकरणी जयेश पुजारी याचा नागपूर पोलिसांकडून वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू आहे. यासंदर्भात एनआयएने सुद्धा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. जयेश पुजारी याच्यासोबत इतर आरोपींचाही पोलीस तपास सुरू आहे. यासंदर्भात नागपूर पोलिसांच्या तीन पथकांनी बेळगाव कारागृहात जाऊन चौकशी केली. कर्नाटक पोलिसांनी सुद्धा यासंदर्भात गुन्हे दाखल केले. आता नागपुरातून एनआयए जयेश पुजारी याला लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे. 100 कोटींच्या खंडणीच्या मागणीसाठी बेळगाव तुरुंगात असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच जयेश कांथा उर्फ शाकीरने धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली. माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते ईश्वरअप्पा यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या नेतृत्वात याविषयीची अनेक गुपिते उघड झाली. अकबर पाशा हा प्रतिबंधित पीएफआयचा सदस्य आहे. त्यामुळे बेळगाव कारागृहात बंद असलेल्या अकबर पाशासह कॅप्टन नसीर, फहद कोया रशीद मालाबारी त्याच्यासह इतर दहशतवादी साथीदारांची चौकशी महत्वाची ठरणार आहे. जयेश पुजारी उर्फ शाकीरचे देश विघातक कामांमध्ये सक्रिय असणाऱ्या लोकांशी संबंध तो बेळगाव जेलमध्ये येण्याच्या पूर्वीपासून होते. बेळगावच्या जेलमधूनही तो त्यांच्या संपर्कात होता असेही उघड झाले आहे. यामुळेच नागपूर, बेळगाव पोलिसांसोबतच आता एनआयएच्या तपासकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news