Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात ५ बाजार समित्या काँग्रेसच्या तर १ भाजपच्या ताब्यात | पुढारी

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात ५ बाजार समित्या काँग्रेसच्या तर १ भाजपच्या ताब्यात

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्हयात काल पार पडलेल्या निवडणूकांचा निकाल आज शनिवारी (दि. २९) घोषीत करण्यात आला. यामध्ये 9 कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मुल, कोरपना, वरोरा येथे काँग्रेसने सत्ता स्थापीत केली आहे. तर नागभिड बाजार समिमी मध्ये भाजपाने 14 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्तास्थापन केली आहे. चंद्रपूर, राजूरा व चिमूर येथे भाजप काँग्रेसच्या अभद्र युतीने सत्ता बळकावली आहे. वरोरा येथे काँग्रेसचे खासदार विरूध्द भाजप, मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी एकत्र येत शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पॅनल उभी करून 8 जागांवर विजय मिळविला आहे.

ब्रम्हपूरी येथे काँग्रेसने विरूध्द भाजपाचा सामना झाला. यामध्ये काँग्रेस प्रणीत शेतकरी विकास पॅनलने 14 जागा मिळवून सत्ता कायम ठेवली आहे. तर भाजपा प्रणीत शेतकरी परिवर्तन पॅनलने फक्त 4 जागांवर विजय मिळविला. माजी मंत्री विजय वड्डेटीवार यांचे नेतृत्वात लढविलेल्या निवडणूकीत काँग्रेसने ब्रम्हपूरीची सत्ता अबाधीत राखली आहे.

मुल येथे मूल येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडीने 15 जागा जिंकून विजय मिळविला. तर प्रतिस्पर्धी शेतकरी महाविकास आघाडीचा दारून पराभव झाली. एकही जागा जिंकतता आली नाही. ही निवडणुक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती.15 जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर 3 जागांवर अपक्ष उमेदवारांची वर्णी लागली आहे. त्यापैकी एक जण रमेश बरडे हे अविरोध निवडून आले. या ठिकाणी काँग्रसेने सत्ता कायम ठेवली.

सिंदेवाही येथे काँग्रसे प्रणीत शेतकरी विकास आघाडीने 11 जागा मिळविल्या. तर भाजपा समर्थीत पॅनलने 7 जागावर समाधान मानले. या ठिकाणीही काँग्रेसची जादू चालली असून सत्ता अबाधित राखली आहे.

जिवती व कोरपना तालुका मिळून असलेल्या कोरपना बाजार समितीमध्ये यावेळी काँग्रेसने सत्ता काबीज केली. काँग्रेस प्रणीत पॅनलचे 13 उमेदवार विजयी झालेत तर गोंडवाणा गणतंत्र पार्टीने 2 तर शेतकरी संघटनेला 3 जागा मिळाल्या. जिवती मधून एकूण 4 उमेदवार निवडून आले. त्यामध्ये काँग्रेस व गोंडवाणी गणतंत्र पार्टीचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी झाले.

चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर व चिमूर या ठिकाणी ऐनवेळी भाजप व काँग्रेस गटासोबत युती झाल्याने दोन्ही ठिकाणी या अभद्र युतीची जादू चालली आहे. चंद्रपूर येथे आतापर्यंत खासदार बाळू धानोरकर गटाचे काँग्रेसचे दिनेश चोखारे यांची सत्ता होती. मात्र यावेळी सत्तांतरणासाठी आली मंत्री सुधीर मुनगंटीवार व व माजी मंत्री विजय वड्डेटीवार यांनी अभद्र युती करून गनीमी काव्याचा वापर करून प्रस्थापित सत्ता उलथवून टाकली. भाजप व काँग्रेसच्या अभद्र युतीने 12 जागा बळकावल्या. तर खासदार बाळू धानोरकर गटाचे दिनेश चोखारे यांना अवघ्या 6 जागावर समाधान मानावे लागले.

चिमूर मध्ये चंद्रपूर प्रमाणेच अभद्र युती पहायला मिळाली. विजय वड्डेटीवार गटाचे युवा कार्यकर्ते दिवाकर निकुरे यांनी, काही दिवसांपूर्वीच चिमूर विधानसभा क्षेत्रात एन्ट्री करून निवडणूकीत रंगत वढविली होती. त्यामुळे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांचेशी सहकार क्षेत्रातील दिगग्ज व काँग्रेसचे संजय डोंगरे यांनी ऐनवेळी हातमिळवणी करून वड्डेटीवार गटाचा धुव्वा उडविला आहे. प्रतिस्पर्धी गटाला फक्त एकाच जागेवर विजय मिळविता आले. तर भांगडिया व डोंगरे गटाच्या शेतकरी सहकार विकास पॅनलने 17 जागां जिंकल्या.
20 वर्षांपासून राजूरा कृषी उत्पन्न् बाजार समितीमध्ये शेतकरी संघटनेची सत्ता होती. मात्र यावेळी काँग्रेस सोबत भाजपाने हात मिळवणी कयन अभद्र युती केल्याने 15 जागां बळकावल्या आहेत. शेतकरी संघटनेला फक्त 3 जागा मिळाल्या. शेतकरी संघटनेचा गड यावेळी अभद्र युतीच्या प्रहाराने ढासळला आहे.

नागभिड बाजार समितीमध्ये भाजपाने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. भाजपा प्रणीत पॅनलचे 14 उमदेवार तर काँग्रेस प्रणीत पॅनलचे 4 उमेदवार विजयी झालेत. यावेळीही भाजपाचे सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.

वरोरा येथे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांचेकरीता प्रतिष्ठेची असलेली निवडणूक चुरशीची झाली. प्रारंभी धानोरकर गटाला धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शेवटच्या टप्यात धानोरकर गटाच्या शेतकरी विकास पॅनलने मुसंडी मारल्याने 8 जागांवर विजय मिळविला. या ठिकाणी भाजप, मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी एकत्र येत शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी पॅनल उभी केली होती. तर वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती वर काँग्रेसची असलेली सत्ता कायम राहावी याकरीता खासदार बाळू धानोरकर यांच्या गटाने शेतकरी विकास पॅनलद्वारे निवडणूक लढवून खासदार, आमदार महोदयांनी जोरदार प्रयत्न केले.

डॉ. विजय देवतळे यांच्या शेतकरी सहकार परिवर्तन आघाडीने 9 जागा मिळविल्या आहेत. डॉ. देवतळे यांच्या गटाला एकहाती सत्ता मिळेल आशा असताना शेतकरी विकास पॅनलला 8 जागा मिळाल्याने ती आशा धुसर झाली. शिंदे गटाच्या शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे भविष्यातील सभापती, उपसभापती पदासाठी शिंदेगटाच्या उमेदवारावर सर्वांचे डोळे असणार आहे. धानोरकर गटाला शिंदे गटाचा उमेदवार जावून मिळाला तर दोन्ही गटात समसमान मते होतील. त्यामुळे वरोरा येथील कृषी उत्पन्न् बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदासाठी होणारी निवडणूक ही चुरशीची होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button