सगळ्यांचे प्रेम एवढे ऊतू का चालले आहे? : अजित पवारांचा खोचक सवाल | पुढारी

सगळ्यांचे प्रेम एवढे ऊतू का चालले आहे? : अजित पवारांचा खोचक सवाल

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार लवकरच सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा गेले काही दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, ना आपण अमित शहा यांना भेटलो, ना शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरले, तरी भाजप सरकारला धोका आहे, अशी तडाखेबाज टोलेबाजी करीत विविध चर्चा त्यांनी निरर्थक ठरविल्या. मविआ सभेच्या निमित्ताने ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

कुणी काय चर्चा करावी हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, माध्यमांनी सत्यता पाहूनच बातम्या द्याव्यात, असा सबुरीचा सल्लाही अजित पवारांनी दिला. शिवसेना नेत्यांकडून याबाबत उघडपणे प्रतिक्रिया दिली जात आहे. त्यातच नागपूरमध्ये होऊ घातलेल्या वज्रमूठ सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विदर्भाचे नेते अनिल देशमुख बोलणार आहेत. मी संभाजीनगरला बोलल्याने नागपुरात बोलणार नाही, प्रत्येक सभेत प्रत्येक पक्षाचे दोनच नेते बोलणार, हे आधीच ठरले आहे असे सांगत त्यांनी हा प्रश्नही योग्यरित्या टोलविला.

ते म्हणाले, मला एक कळत नाही की माझ्यावर सगळ्यांचे प्रेम एवढे का ऊतू चालले आहे? दोन दिवस बघतोय, गुलाबराव पाटील बोलले, उदय सामंत बोलले, दादाजी भुसे बोलले. अनेकांची वक्तव्ये मी ऐकली. या सगळ्यांचे एवढं प्रेम का उतू चालले आहे, ते कळायला मार्ग नाही. मी माझी भूमिका तुमच्यासमोर ठेवली आहे. इथेही अजित पवार येणार की नाही? आले तर भाषण करणार की नाही करणार? बसणार तर कुठे बसणार? अशी चर्चा लोकांनी सुरू केली होती, अशी मिश्किल टोलेबाजीही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या होम पीचवर ही सभा होत असल्याचेही बोलले जात आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात कुणाची ना कुणाची होम पीच असणारच आहे. आम्ही राज्याच्या वतीने तिथे सभा घ्यायला जातोय. जसे त्यांचे होम पीच आहे, तसे अनिल देशमुख, सुनील केदारांचेही होम पीच आहे. नितीन राऊतांचेही होम पीच आहे, असे ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी अजित पवार यांची गुप्त भेट झाल्याच्या चर्चेलाही त्यांनी पूर्णविराम लावला. त्यांना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात भेट कुठे झाली? केव्हा झाली? मुंबईत अमित शहा उतरल्यापासून सगळे चॅनल त्यांच्या पाठिशी होते. तिथून ते विनोद तावडेंच्या घरी गेले. तिथून ते सह्याद्रीला गेले. मी कालच नागपुरात येणार होतो. पण, सभा संध्याकाळी असल्यामुळे अनिल देशमुखांशी बोलणे झाले. जयंत पाटील येत आहेत. एक कार्यक्रम आहे, तो करून दुपारी अनिल देशमुखांकडे आमचे जेवण आहे. त्यामुळे या सगळ्या बातम्या बिनबुडाच्या आहेत. अशा गोष्टी लपून राहत नसतात. त्यामुळे कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचे काम कुणीही करू नये, असेही पवार यांनी ठणकावले.

हेही वाचा 

Back to top button