बुद्धीस्ट सर्किटप्रमाणे जैन सर्किटची योजना आखणार : नितीन गडकरी | पुढारी

बुद्धीस्ट सर्किटप्रमाणे जैन सर्किटची योजना आखणार : नितीन गडकरी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भगवान बुद्धांच्या सर्व वारसा स्थळांना जोडणाऱ्या बुद्ध सर्किट प्रमाणेच जैन धर्मातील सर्व तीर्थस्थळांना जोडणारी जैन सर्किट योजना राबविण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थातर्फे आयोजित जैन सैतवाळ समाजाचे दोन दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात ये राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी गडकरी म्हणाले की, भगवान महावीर यांनी जो संदेश दिला आहे त्यानुसार आपले आचरण महत्त्वाचे आहे. सर्वधर्माची शिकवण एकच असून यामागे सर्व विश्वाचे कल्याण झाले पाहिजे. भारतीय संस्कृती ही जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनावी भारतातील सर्व धार्मिक स्थळांचा विकास व्हावा ही भूमिका असून या सर्व धार्मिक स्थळांवर स्वच्छतेबरोबरच आचार व विचार सुद्धा उच्च व आदर्श राहावे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. समाजाच्या सर्वांगीण विकासासोबत तरुणांना उच्च शिक्षणाच्या संधी रोजगार व स्वयंरोजगार तसेच माहिती तंत्रज्ञानावर आधारित संशोधन करणारी पिढी निर्माण व्हावी. तसेच समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा यावेळी गडकरी यांनी व्यक्त केली.

महाअधिवेशनाचे उद्घाटन बडोदा येथील अजित जैन यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अखिल भारतीय अध्यक्ष दिलीप घेवारे उपस्थित होते. ध्वजारोहण गुलाबराव फुरसुले यांच्याहस्ते झाले. यावेळी श्रावणे आयोजन समितीचे अध्यक्ष नितीन नखाते राजेंद्र नखाते महामंत्री मुकुंद वालचाळे सुभाष कुकेकर, अनंतराव चाणेकर, सन्मती कुरकुटे, विवेक भागवतकर, आनंदराव सवाने, दिलीप शिवणकर, रमेश रणदिवे, चंद्रकांत वेखंडे, विजयकुमार लुंगाडे, नारायण पळसापुरे, सुनील सिंगतकर, सुरेश कहाते, प्रमोद जैन, दिलीप चौधरी, जगदीश गिल्लरकर, सुनील फरसुले आदी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.

दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात समाजातील विविध सामाजिक विशेषता धार्मिक विषयासंदर्भात चर्चा होणार आहे. यामध्ये जागर स्त्री शक्तीचा, संकल्प समाजोन्नतीचा तसेच शेवटच्या सत्रात खुले अधिवेशन होणार आहे संपूर्ण देशभरातून आलेल्या प्रतिनिधींचे मनोगत यावेळी होणार आहे.

Back to top button