मविआच्या सभेपूर्वी काँग्रेस नेत्यांकडून पुन्हा सावरकर ‘लक्ष्य’, ठाकरे गटाचे मौन | पुढारी

मविआच्या सभेपूर्वी काँग्रेस नेत्यांकडून पुन्हा सावरकर ‘लक्ष्य’, ठाकरे गटाचे मौन

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : रविवारी (दि. १६) मविआची जाहीर सभा नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावर होणार आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त विधान केले. “बलात्कार हे एक राजकीय हत्यार, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा, असे सावरकरांचे विचार होते” असा दावा शिवानी वडेट्टीवार यांनी एका जाहीरसभेत बोलताना केला. भाजपने या आरोपांचा समाचार घेतला. काँग्रेस नेत्याकडून आलेल्या या वक्तव्यामुळे आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ‘वज्रमूठ’ सभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून पुन्हा सावरकरविरोधी वाद उकरून काढण्यात येत असल्याचे दिसत आहे.

चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात शिवानी वडेट्टीवार यांनी हे विधान केल्यानंतर खळबळ माजली. हा विषय फार गंभीर आहे, असे मला वाटत नसल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. सावरकर यांच्या एका पुस्तकातील हा संदर्भ असल्याचे शिवानी यांनी आपल्याला सांगितल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ती पुस्तकाचा आधार घेऊन बोलली असेल, तर त्यावर वाद होण्याचे काहीच कारण नाही. पण मला माहिती नाही की ती कोणत्या संदर्भात बोलली आहे. ती स्वत: वकील आहे. त्यामुळे तिला वाचनाचाही मोठा छंद आहे. कुठल्यातरी पुस्तकाचा तिने संदर्भ घेतला व ते तिचे तिचे मत आहे, असे ते म्हणाले.

Back to top button