गांधीजींच्या विचारानेच गोडसे विचाराला पराभूत करू : नाना पटोले | पुढारी

गांधीजींच्या विचारानेच गोडसे विचाराला पराभूत करू : नाना पटोले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जे गांधीजींच्या वाटेला गेले त्यांचे या देशात पतनच झाले, हा या देशाचा इतिहास आहे. केवळ अदानी, मोदी म्हणजे ओबीसी होतात का, आम्ही ओबीसी नाही का, जातनिहाय जनगणनेचा ठराव मी माझ्याच अध्यक्ष पदाच्या काळात केला. मोदी-अदानींचा अपमान म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान होतो का? भाजपचा हा दुटप्पीपणा असून ओबीसी समाजबांधवांना तो लक्षात आलेला आहे असे सडेतोड प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. संविधान चौकातील दिवसभराच्या सत्याग्रह आंदोलनानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आमदार विकास ठाकरे, राजेंद्र मुळक आदी उपस्थित होते.

ओबीसी हा अन्नदाता शेतकरी असून तो लुटारू प्रवृत्तीचा असू शकत नाही. २० हजार कोटी रुपये अदानींच्या खात्यात जातात मात्र सामान्यांच्या खात्यात १५ लाख रुपये मोदी सरकारने अद्याप दिले नाहीत. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून नरेंद्र मोदी यांची अदानी यांच्याशी मैत्री आहे. आज पुन्हा एकदा ते हितसंबंध जोपासले जात आहेत. देश पातळीवर राहुल गांधी विरोधातील सूडबुद्धीने केलेल्या या सर्व कारवाईच्या विरोधात भाजप विरोधी पक्ष एकवटत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासून काँग्रेसने अहिंसात्मक आंदोलनाने जल्लाद प्रवृत्तीच्या इंग्रजांशी लढा दिला. आताही अहिंसात्मक मार्गानेच लढा दिला जाईल. आज संविधान धोक्यात असल्याने कार्यकर्त्यांनी घरी बसून नव्हे तर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. राहुल गांधींना भाजपने देशद्रोही ठरवले आहे या विरोधात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लढा देणे गरजेचे आहे. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारणाऱ्यांची सत्तेची गर्मी जनता आणि आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही. गांधी विचारानेच गोडसे विचारांशी लढू आणि जिंकु आवश्यकता पडेल तेव्हा आक्रमकता देखील दाखवू असेही यावेळी पटोले म्हणाले.

Back to top button