नितीन गडकरी धमकी प्रकरण; पोलिसांनी केले २ फोन, सीम जप्त | पुढारी

नितीन गडकरी धमकी प्रकरण; पोलिसांनी केले २ फोन, सीम जप्त

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोन फोन आणि दोन सीम नागपूर पोलिसांनी अखेर जप्त केले आहेत. मंगळवारी ही धमकी आल्यानंतर तातडीने या संदर्भात नागपूर पोलिसांचे पथक बेळगाव कारागृहाच्या दिशेने रवाना झाले होते. कारागृहात सर्च दरम्यान हे दोन्ही फोन आणि सीम पोलिसांच्या हाती लागले. आज (दि.२४) नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी याविषयीची माहिती दिली.

यातील एका फोनवरून मंगळवारी तर दुसऱ्या सीमवरून यापूर्वी कुख्यात आरोपी जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याने गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन कॉल केल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहे. लवकरच आरोपी जयेशला नागपुरात पुढील तपासासाठी आणण्यात येणार असून याविषयीची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अमितेशकुमार यांनी दिली. विशेष म्हणजे ज्या रझिया नामक मुलीच्या नावाचा वापर या प्रकरणी केला गेला. तिची कुठलीही गुन्हेगारी विषयक पार्श्वभूमी नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. याच प्रकारे त्याने खंडणीसाठी अनेक नेत्यांना फोन कॉल केल्याची माहिती असली तरी तो तपास स्थानिक पोलिसांकडे असल्याचे सांगितले.

यासोबतच सातत्याने कारागृहात गुन्हेगाराकडे फोन जातात कसे, याविषयी छेडले असता हा स्थानिक पोलीस तपास करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी पहिला फोन सुरक्षा रक्षकांनी घेतला. धमकी देणाऱ्याने आपले नाव जयेश पुजारी असे सांगितले आणि १० कोटींची मागणी केली. गडकरी यांच्या कार्यालयातील लँडलाईन क्रमांकावर हे धमकीचे कॉल आले. या कॉलप्रकरणी कार्यालयाने नागपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली. गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात हे दोन्ही वेळी धमकीचे कॉल आले.

धक्कादायक म्हणजे जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे कॉल आले. यापूर्वी १०० कोटींची खंडणी मागण्यासाठी जयेशच्या माध्यमातून कुख्यात दाऊदच्या नावाने गडकरींना धमकीचे, कार्यालय उडविण्याच्या धमकीचे फोन आले होते. याविषयीचा मागोवा घेण्यासाठी नागपूर पोलिसांचे पथक बेळगावला जाऊन आले. अनेक नावे, नंबर असलेली एक डायरी पोलिसांनी जप्त केली होती. आता दोन महिन्यात पुन्हा धमकीचे फोन आल्यानंतर नागपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला. मोबाईल, सीम जप्त केले, हा भक्कम पुरावा हाती लागल्याने या प्रकरणी लवकरच अधिक उलगडा होण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

हेही वाचा 

Back to top button