जहाल नक्षलवाद्यास अटक: गडचिरोली पोलिसांची कारवाई | पुढारी

जहाल नक्षलवाद्यास अटक: गडचिरोली पोलिसांची कारवाई

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : नक्षलवाद्यांच्या ‘टीसीओसी’ सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी एका जहाल नक्षल्यास अटक केली आहे. प्रकाश उर्फ देविदास उर्फ आडवे मुरे गावडे (२७ रा.मर्दहूर,ता. भामरागड) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.

फेब्रुवारी ते मे या काळात नक्षलवादी ‘टीसीओसी’ (‘टक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन’) साजरा करतात. यादरम्यान ते मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया घडवून आणतात. ९ मार्चच्या रात्री भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस मदत केंद्रांतर्गत मर्दहूर या गावचा सुशिक्षीत युवक साईनाथ नरोटी याची नक्षल्यांनी गोळी झाडून हत्या केली होती.या घटनेत नक्षली प्रकाश उर्फ देविदास गावडे व अन्य दोघांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर काल त्याला अटक करण्यात आली.

नक्षली प्रकाश गावडे हा मार्च २००० पासून नक्षल चळवळीत असून, त्याने विविध दलममध्ये काम केले आहे. त्याच्यावर २२ गुन्हे दाखल आहेत. साईनाथ नरोटीच्या हत्येच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली असून, या हत्येत सहभागी अन्य दोन आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Back to top button