वाऱ्याच्या वेगाने धावल्या सावरगावात ८० बैलजोड्या; शंकर पटाची ७१ वर्षाची परंपरा | पुढारी

वाऱ्याच्या वेगाने धावल्या सावरगावात ८० बैलजोड्या; शंकर पटाची ७१ वर्षाची परंपरा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील शंकर पटाला गत वर्षापासून राज्यात सुरुवात झाली. शंकर पटाची ७१ वर्षांची परंपरा कायम ठेवत शंकर पट कमेटी, नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सावरगाव येथे दोन दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान सावरगावात ८० बैलजोड्या धावल्या आहेत.

पहिल्या दिवशी नरखेड पंचायत समिती व कृषी विभागाच्यावतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन राणी लक्ष्मीबाई कृषी तंत्र विद्यालय आणि सावरगावचे प्रांगणात करण्यात आले. या ठिकाणी ‘अ’ गटामध्ये ३५ व ‘ब’ गटामध्ये ४५ अशा एकूण ८० बैलजोड्या धावल्या. यानिमित्ताने अनेक नामांकित जोड्या सावरगाव येथे शंकर पटात डेरे दाखल झाल्या होत्या. सोमवारी बैलबंड्यांच्या शर्यतीचा थरार हजारो शौकिनांच्या उपस्थितीत रंगला. एकीकडे वेगाने धावणाऱ्या बैलजोड्या होत्या. तर दुसरीकडे उपस्थितांकडून आवडीच्या जोडीसाठी चिअरअप केले जात होते.

‘अ’ गटात रामप्रसाद राठोड बैतूल यांची जोडी प्रथम (८.१८ सेकंद) तर कोमल नांदूरकर, पुलगाव द्वितीय (८.२० सेकंद), आतिश वर्मा, वाशीम यांची जोडी तृतीय (८.३०) सेकंद घेऊन तृतीय तर ‘ब’ गटामध्ये प्रथम मनोज भोंडवे, खैरी (८.८१ सेकंद) द्वितीय भाऊसाहेब पवार, उमठा (८.९३ सेकंद) तृतीय प्रकाश पाटील कुरेकर, भायवाडी (९.२१ सेकंद) मध्ये आल्या आहेत. नरखेड तालुक्यातील सावरगाव परिसरातील हा शंकरपट पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अनेक जिल्ह्यातील पशुप्रेमी हा शंकरपट पाहण्यासाठी गर्दी केली. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतीउपयुक्त उपकरणांची माहिती देखील शेतकऱ्यांना मिळाली.

आयोजनासाठी शंकरपट कमेटीचे जगन्नाथ मेटांगळे, सुरेश गोडबोले, रमेश रेवतकर, रमेश जयस्वाल, गणपत घोडे, मनोज गोडबोले, उमेश सावंत, संजय कामडी, अजय घाडगे, मुकेश सावंत, प्रविण वासाडे, ज्ञानेश्वर बालपांडे, रामराव हिरूडकर, बशीर पठाण, संदेश भांडवलकर, अनिकेत सावंत, पंकज मेटांगळे, समीर गोडबोले आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा : 

Back to top button