नागपूर : इंस्टाग्रामवर जादा पैशाचे आमिष दाखवणाऱ्या आठ आरोपीना अटक; ५८ लाखांची रोकड जप्त | पुढारी

नागपूर : इंस्टाग्रामवर जादा पैशाचे आमिष दाखवणाऱ्या आठ आरोपीना अटक; ५८ लाखांची रोकड जप्त

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : इंस्टाग्रामवरून विक्रांत एक्सचेंज कंपनीच्या माध्यमातून तीन दिवसात तीन टक्के व्याजासह पैसे परत करण्याचे आमिष देत कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला. या घटनेतील आठ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून नोटा मोजण्याच्या दोन मशीन, ५८ लाख रुपयांची रोकड, सहा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इंस्टाग्रामच्या साह्याने फसवणुकीचा हा प्रकार नागपुरात पहिल्यांदाच उघडकीस आल्याची माहिती मिळाली.

अधिक रकमेचा परतावा देण्याचे आमिष देत ही टोळी ‘ऑनलाईन’ पैसे टाकण्यास सांगत होती. विशेष म्हणजे कंपनीकडे गुंतवलेले पैसे बुडण्याची भीती दाखवत पुन्हा त्यांना ब्लॅकमेल करायचे व अधिकचे पैसे टाकण्यास सांगायचे. ही सर्व रक्कम ऑनलाईन पद्धतीने परराज्यातील लोक स्वीकारत होते. हायटेक तंत्रज्ञानाने ही सर्व फसवणूक गेले काही दिवस सुरू होती. यातील बहुतांशी आरोपी हे गुजरातमधील आहेत.

फिर्यादी साहिल विनोद सिंग चव्हाण (वय 24 वर्ष रा. बन्सी नगर, हिंगणा रोड) याने विक्रांत एक्सचेंज नावाने इंस्टाग्रामवर जाहिरात बघितली. गुंतविलेल्या रकमेवर तीन दिवसात तीन टक्के व्याजदराने परतावा मिळेल या आमिषाला तो बळी पडला. फिर्यादी साहिलने या योजनेची माहिती त्याचा मित्र शुभम काळबांडे याला दिली. या दोघांनी यात बऱ्यापैकी रक्कम गुंतवली. या कंपनीकडे पैसे परत मागितल्यानंतर पुन्हा पैसे टाका नाहीतर टाकलेले पैसे पण बुडतील असे कंपनीच्या एका व्यक्तीने त्यांना बजावले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी साहिलने राणा प्रताप नगर पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी कलम 384, 420, 34 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, साहिलने मोबाईलच्या आधारे माहिती काढत या कंपनीचा माग घेतला. यावेळी आरोपी रोहित पटेल यांनी या दोघांकडून पैसे स्वीकारण्याचे उघड झाले. फोनवर आपल्याला ही रक्कम कोणास द्यायची हे देखील सांगितले जात होते. त्यानुसार हा सर्व व्यवहार चालत असल्याची माहिती रोहितने दिली यानंतर शुभम काळबांडे याने या प्रकरणी मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला व संपर्क साधून पैसे कुठे आणून द्यायचे ते विचारले. उपायुक्त झोन 1 यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक कामाला लागले.

विक्रांत एजन्सीचे दोन इसम रक्कम स्वीकारण्यासाठी आले यानंतर लगेच तिसऱ्या इसमाने त्यांना गायत्री नगरात नेले. नियोजित सापळ्यानुसार पंचासह पोलीस त्या ठिकाणी पोहोचले असता मशीनवर नोटा मोजण्याचे काम सुरू होते. लकडगंज पोलिसांच्या मदतीने यावेळी दोन नोटा मोजण्याच्या मशीन, सहा मोबाईल ५८ लाख ३६ हजार ५२५ रुपये जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे यात बहुतांशी 2000 आणि 500 च्या नोटा आहेत. पोलिसांनी मुरे गृह उद्योग फर्म, रोहित पटेल, अर्जुन चंद्रभान राठोड, धर्मेंद्र अकोबावाला मुक्काम सिंबर, गुजरात हल्ली मुक्काम वर्धमान नगर, निलेश कुमार मनुप्रसाद दवे, धर्मोळा, गुजरात ,विष्णू भाई कृष्णादास पटेल, वीरमसिंग जयवंत राठोड, जिल्हा सोमनाथ जिल्हा सोमनाथ, विक्रम सिंग वाघेला जिल्हा पाटण, जोरूबा जेलुशी वाघेला जिल्हा पाटण, गुजरात अशा आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त अस्वती दोरजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त झोन 1 अनुराग जैन, गोरख भामरे, अशोक बागुल,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश काळे, हरीश कुमार बोराडे, अमिता जयपुरकर आदींनी ही कारवाई केली.

Back to top button