Yavatmal Crime News : उसनवारीचे पैसे मागितल्याने प्रहार पक्षाच्या नगरसेवकाचा खून | पुढारी

Yavatmal Crime News : उसनवारीचे पैसे मागितल्याने प्रहार पक्षाच्या नगरसेवकाचा खून

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : ट्रक दुरूस्तीसाठी उसनवारीने दिलेले पैसे परत मागणीसाठी गेलेल्या बाभूळगाव नगरपंचायतीतील प्रहार पक्षाचे नगरसेवक अनिकेत विलास गावंडे (वय ३०) यांची धारदार शस्त्राने वार करून खून (Yavatmal Crime News)  करण्यात आला. रविवारी (दि.१२) रात्री १०.३० च्या सुमारास बाभूळगाव तालुक्यातील मिटणापूर येथे ही घटना घडली. दरम्यान या प्रकरणातील संशयित ३ आरोपींना आज (दि.१३) सकाळी ६ च्या सुमारास बाभूळगाव पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून तणावपूर्ण शांतता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी सद्दु उर्फ सादिक मुल्ला सलीम मुल्ला (वय २७ रा. मिटणापूर) व नगरसेवक अनिकेत गावंडे चांगले मित्र होते. काही दिवसापूर्वी सद्दु उर्फ सादिक मुल्ला यांनी अनिकेतकडून ट्रक दुरूस्तीसाठी २१ हजार रूपये उसनवारीने घेतले होते. रक्कम परत मागण्यासाठी रविवारी रात्रीच्या सुमारास अनिकेत मिटणापूर येथील सद्दु उर्फ सादिक मुल्ला यांच्या घरी गेले होते. यावेळी उसनवारीच्या पैशावरून त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेला. सादिक मुल्ला याने धारदार शस्त्राने वार करून (Yavatmal Crime News)  अनिकेतला गंभीर जखमी केले. अनिकेतला उपचारासाठी यवतमाळ येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

अनिकेतचा भाऊ शुभम विलास गावंडे यांनी बाभूळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेतील संशयित आरोपी सद्दु उर्फ सादिक मुल्ला सलीम मुल्ला (वय २७), गोलू उर्फ समिर मुल्ला सलीम मुल्ला (वय २५ ) व सोनु उर्फ आबिद मुल्ला सलीम मुल्ला ( वय २२, तिघेही रा. मिटणापूर) यांना अटक करून त्यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Yavatmal Crime News : बाभूळगाव शहर कडकडीत बंद

एक वर्षापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले प्रहार पक्षाचे नगरसेवक अनिकेत गावंडे यांच्या खुनामुळे एकच खळबळ उडाली. घटनेच्या निषेधार्थ बाभूळगाव शहरातील बाजारपेठ आज कडकडीत बंद ठेवण्यात आली. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा 

Back to top button