चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील रेतीघाटातून 1 कोटी 63 लाखांच्या मशिन जप्त | पुढारी

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील रेतीघाटातून 1 कोटी 63 लाखांच्या मशिन जप्त

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिह्यातील वरोरा तालुक्यातील बामर्डा घाटातून पोकलेन मशीनद्वारे वाळूचा अवैधरित्या उपसा केला जात होता. याची माहिती मिळताच महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करीत घाटावर धाड टाकून 1 कोटी 63 लाख रुपये किमतीचे पोकलेन मशीन, हायवा ट्रक व बेलोरा पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर वाळू तस्कराविरोधात वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील काही वाळूघाटांचे लिलाव करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील बामर्डा वाळू घाट हा लिलावातून मोहम्मद इम्रान सिद्धकी मन्नू सिद्धकी यांना मिळाला. अटी, शर्तीचे उल्लंघन न करता वाळू उपसा करण्यात यावे, असे लिलावाच्या आदेशात नमूद केले आहे. परंतु, नदीपात्रात माती व गोटे टाकून पाण्याचा प्रवाह बदलवित पोकलेन मशीनद्वारे वाळूचा उपसा करण्यात आला. उपसा केलेल्या वाळुची हायवा ट्रकद्वारे वाहतूक केली जाणार असल्याची माहिती महसूल आणि पोलिस विभागाला मिळाली. या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेतीघाटावर धाड टाकली.

यावेळी घटनास्थळावर दोन पोकलेन मशीन, नऊ हायवा ट्रक, बेलोरा पिकअप वाहन आढळून आले. अधिकाऱ्यांनी सर्व वाहने जप्त केली. या वाहनांची किमत सुमारे एक कोटी ६३ लाख आहे. घाटमालक मोहम्मद इम्रान सिद्धकी मन्नू सिद्धकी व त्याचा सुपरवायझर, वाहन मालक, चालक यांच्याविरोधात वरोरा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी, तहसीलदार सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक अजित देवरे, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश चावरे, मनोर आमने, गुरू शिंदे, मंडळ अधिकारी बराजपुरे यांनी केली.

Back to top button