नागपूर: पुढारी वृत्तसेवा: देशातील ४७ बँकांमध्ये गेल्या वर्षभरात अर्थात २०२२ सालात आर्थिक फसवणुकीची ६४ हजार ८५६ प्रकरणे नोंदविली गेली आहेत. यात बँकांची ३९ हजार ६९८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची खळबळजनक माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागविलेल्या माहितीच्या आधारे बँकेने ही माहिती उघड केली आहे.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत झालेल्या घोटाळ्यांमध्ये फसवणुकीची सर्वाधिक १८ हजार ३३० प्रकरणे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड या बँकेतील आहेत. या बँकेची ११८.६५ कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
ॲक्सिस बँकची ६ हजार ८४२ प्रकरणांमध्ये ६३०. ६९ कोटी रुपयांनी तर एचडीएफसी बँकची २ हजार ६०८ प्रकरणांमध्ये ३०६.४० कोटींनी, आयसीआयसीआय बँकेची ४ हजार ४२४ प्रकरणांमध्ये ६४५.८७ कोटी रुपयांनी, इंडूसलॅन्ड बँकेची ५ हजार १८४ प्रकरणांमध्ये २२६.४३ कोटी रुपयांची, आरबीएल बँकेची ८ हजार ३५९ प्रकरणांमध्ये ३३१.५५ कोटी रुपयांची, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेची २ हजार ८९० प्रकरणांमध्ये ५१२.०८ कोटी रुपयांची आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची २ हजार ८७७ प्रकरणांमध्ये ५ हजार ५२७.४४ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. इतरही बँकांची कमी अधिक प्रमाणात फसवणूक झाल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये सहकारी बँकांवर विविध निर्बंध लादण्यात येताहेत. नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ५ सहकारी बँकांवर निर्बंध लावले. मागील वर्षभरात १२ नागरी सहकारी बँकांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचा