नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सोमवारी (दि. २७) निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर देशव्यापी आंदोलन करण्यात आले. एकीकडे ऑनलाइन फॉर्म भरा असे सांगितले जाते दुसरीकडे यंत्रणा बंद आहे. वयोवृद्ध पेन्शन धारकांची सरकार गेली दहा वर्षे वाढीव पेन्शनसाठी संघर्ष करूनही कुचंबना करीत आहे या विरोधात निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीने आज केंद्र व राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. नागपुरातील दिघोरी परिसरातील ईपीएफओ आयुक्त मुख्यालय कार्यालयासमोर हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
ज्या मताधिकाराने तुम्हाला सत्तेत आणले त्याच मतांचा अधिकार वापरून आम्ही तुम्हाला आगामी सर्व निवडणुकीत धडा शिकवू. सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशारा या आंदोलनात देण्यात आला. यावेळी नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट भीमराव डोंगरे ,नॅशनल जनरल सेक्रेटरी प्रकाश पाठक ,राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडे ,उपाध्यक्ष पुंडलिक पांडे, बी ब्रम्हा, उपसचिव चंद्रशेखर पारसी आदींनी मार्गदर्शन केले. दिल्ली दरबारी दहा वेळा आंदोलने झाली असताना सरकार आपले दिलेले आश्वासन पाळत नाही.
कंपन्या बंद पडलेल्या असल्याने संयुक्त अर्ज कर्मचारी कुठून करणार, सरकार प्रशासन वयोवृद्धांची दशा करणार असेल तर आम्ही त्यांची दुर्दशा केल्याशिवाय राहणार नाही असे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश पाठक म्हणाले. देशभरात ७२ लाख ७३ हजार पेन्शनधारक गेली दहा वर्षे संघर्ष करीत आहे. किमान पेन्शन ९००० अधिक महागाई भत्ता याप्रमाणे मिळावी अशी त्यांची मागणी आहे. ३ मार्च पर्यंत वाढीव पेन्शन साठी अर्ज करा असे सांगितले जाते ,सोशल मीडियावर तसे मेसेजेस फिरतात मात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना कुठेही विश्वासात घेतले जात नाही. इथे आल्यानंतर ३ मे ही तारीख वाढल्याचे सांगितले जाते अशी नाराजी या निमित्ताने कार्याध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी बोलून दाखविली.