

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली व त्यांचे मित्र ताडोबा जंगलसफारीसाठी चंद्रपुरात तीन दिवस मुक्कामी आहेत. सोमवारी (दि. २०) दुसऱ्या दिवशी सकाळच्या सफारीत बछड्यासह बबली, झरणी व छोटा मटका वाघ वाघिणीचे दर्शन झाले. दरम्यान अलझंझा निमदेला गेटवर परत येताना सचिन व अंजली यांनी ताडोबाच्या उत्तम व्यवस्थापनाबाबत लेखी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मंगळवारी (दि. २१) तिसऱ्या दिवशीही सचिन सफारी करणार असून त्यांनंतर तो मुक्काम हलविणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरवर्षी प्रमाणे तिसऱ्यांदा शनिवारच्या रात्री साडेआठच्या सुमारास क्रिकेट जगताचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजली व काही मित्रांसह ताडोबात तीन दिवसाच्या व्याघ्र दर्शनाकरीता मुक्कामी आला आहे. काल पहिल्या दिवशी रविवारी त्यांनी सफारीचा आनंद घेतला. यामध्ये त्यांना व्याघ्र दर्शनही झाले. आज सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अलीझंझा निमदेला, कोअर व सायंकाळी परत अलीझंझा गेटद्वारे ताडोबातील व्याघ्र दर्शनाकरिता सफारी केली. सकाळच्या वेळी बछड्यासह बबली व झरनी वाघिणीचे दर्शन झाले. तर सायंकाळी छोटा मटका या रूबाबदार वाघाला जवळून पाहता आले. आज पर्यटनाचा त्यांचा दुसरा दिवस आहे. दोन दिवसात त्यांना वाघ वाघिणांच्या बछड्यांसह दर्शन झाल्याने पर्यटनाचा आनंद लुटता आला. सचिनची ही ताडोबातील तिसरी वारी आहे. ताडोबातील झुणाबाई व विविध नावांनी प्रसिध्द असलेल्या वाघ वाघ वाघिणींचा सचिन यांना चांगलाच लळा आहे. त्यामुळे सचिनची ताडोबा वारी प्रत्येक वर्षी ठरलेली आहे.
आज सोमवारी पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर दुपारी साडेतीन वाजताचे सुमारास अलीझंझा निमदेला गेटवरून बांबू रिसार्टवर परत येतांना त्यांनी ताडोबा व्यवस्थापनाची स्तुती केली आणि खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी गेटवरील व्हिजीट बुक मध्ये म्हटले आहे की. ताडोबातील बिग फाईव्ह मध्ये व्याघ्रदर्शन करताना रोमांचकारी अनुभव आला. ताडोबा या ठिकाणी सुंदर व्यवस्थापन दिसून आले. दर्जेदार जंगल टिकवून ठेवण्याकरीता ताडोबा व्यवस्थापनाने काळजी घेतली आहे. मी ज्या ठिकाणी कुटी मध्ये थांबलो त्या ठिकाणी मी आनंदी झालो. त्याठिकाणी असलेल्या एक शौचालय स्वच्छ व निटनेटका होता. त्यावर एक डागही नव्हते. अप्रतिम व्यवस्थापनाने आम्ही भारावलो आहोत. ताडोबाचे उपसंचालकापासून वर वनरक्षकापर्यंत व या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा व मन्सवी आभार आहे. या ठिकाणच्या सर्व कुटीज वनांचे रक्षण करण्याकरीता महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळेच व्याघ्र दर्शनाची खरी संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. या ठिकाणाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रेनफॉलमध्ये सुधारणा झाली आहे. ते सर्व उत्तम नियोजनाचे फलीत असल्याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे.