

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : एटीएम मधून पैसे काढताना अडचण येणाऱ्याना मदत करण्याचे भासवून एटीएम कार्डची अदलाबदल करुन आर्थिक फसवणूक केली जात होती. अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर २०२२ रोजी ब्रम्हपुरी येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये माजी सैनिक वामन गोसाई दिघोरे (रा. किन्ही, ता. ब्रम्हपुरी) यांना पैसे काढताना अडचण आली. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएम कार्ड बदलुन दुसरे कार्ड दिले. दिघोरे यांनी ३ दिवसांनी परत एटीएममध्ये जावुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला आणि याच दरम्यान त्यांच्यासोबत फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बँकेतुन स्टेटमेंट काढून तपासणी केली असता १० हजार रुपये वडसा येथील एटीएम मधुन काढल्याचे समजले. तसेच ७४,९९७ रुपयांचा ऑनलाईन व्यवहार झालेले देखील आढळून आले. अशी एकुण ८४ हजार ९९७ रुपयांची फसवणुक झाल्याची ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणातील अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. सीसीटिव्ही फुटेज व विविध तांत्रिक पुराव्याच्या आधारे हे आरोपी हरियाणा राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. तसेच ते वापरत असलेले वाहन हरीयाणा पासींग असल्याची खात्री पटली. त्याआधारे आरोपींचा शोध सुरु झाला. ७ नोव्हेंबर २०२२ ला आरोपींना पकडण्याकरीता पाठविले असता ते पसार झाले होते.
नागपुर येथील ग्रामीण पोलीसांच्या सहकार्याने तीन इसमास ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये जोगीदरसिंह चंदरसिंह बिटट्टु (वय २६ मूळचे हरीयाणा), राजेश रेलुराम माला (वय ४५ मूळचे हरीयाणा), पुनीत शिवदत्त पांचाल, (वय ३२ मूळचे हरीयाणा) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ७२ ATM कार्ड, ४३,००० रु. रोख रक्कम, तीन मोबाईल, गुन्हा करण्याकरीता वापरण्यात आलेले HR-21. P-0125 या क्रमांकाचे वाहन जप्त करण्यात आले.
या आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आलेले ATM कार्ड हे विविध राज्यातील व्यक्तींचे आहेत. हे आरोपी राजस्थान, गुजरात, तेलगांना, मध्यप्रदेश, महाराष्ट्र अशा विविध राज्यामध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करुन नागरिकांची फसवणुक करीत असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. सदर आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकून जेलमध्ये पाठविले.