

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर- मुल मार्गावरील महादवाडी गावाजवळ एका ट्रकला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला. हा अपघात आज गुरुवारी (दि. १६ फेब्रुवारी) रोजी महादवाडी गावाजवळच्या वळणावर पहाटेच्या सुमारास घडला आहे. पवन अनिल परसवानी ( कन्नमवार, वार्ड वडसा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलवरून चंद्रपूरला माल भरण्यासाठी एक ट्रक (क्रमांक एम. एच. ०४ ई. एल. ७१०० ) जात होता. तर चंद्रपूरहून वडसाकडे पवन परसवानी त्याच्या कारने ( क्रमांक एम.एच. ३३ व्ही. १९१४) येत होता. याच दरम्यान चंद्रपूर मार्गावरील महादवाडी गावाजवळ ट्रकला कारने जोरदार धडक दिली आणि या घटनेत पवन परसवानी जागीच ठार झाला.
या घटनेची माहिती काही नागरिकांनी मुल पोलीस स्टेशन ठाण्यात दिली. यानंतर पोलीसानी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि कारमध्ये अडकलेल्या पवनला बाहेर काढले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
हा अपघात इतका भीषण होता की, कारची समोरील बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. पवन परसवानी हा काल उपारासाठी चंद्रपूरला डॉ. दासरवार यांच्याकडे आला होता. रात्र झाल्यामुळे त्याने चंद्रपूर येथे मुक्काम करून पहाटे ४ वाजता वडसा गावाला निघाला होता. ट्रक चालक पांडुरंग रावसाहेब काळे याला पोलिसांनी अटक केली असून मुल पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :