चंद्रपूरमध्ये मिनी मालवाहक गाडी पलटली; ३१ जण जखमी | पुढारी

चंद्रपूरमध्ये मिनी मालवाहक गाडी पलटली; ३१ जण जखमी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नातेवाईकाकडे नामकरण विधीच्या कार्यक्रमासाठी जात असताना मिनी मालवाहक गाडी उलटून ३१ जण जखमी झाल्याची घटना घडली. सोमवारी (दि. ६) दुपारी २ वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी शहरातील टिळक नगर येथे ही दुर्घटना घडली. यामध्ये ३१ जण जखमी झाले असून आठ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.

याबाबतच्या अधिक माहितीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यातील रनमोचन गावातील महिला व लहान मुले असे मिळून एकूण ३२ जण या वाहनामधून प्रवास करत होते. लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील नातेवाईकांकडे नामकरण विधीच्या कार्यक्रमासाठी ते मिनी मालवाहक गाडीतून जात होते. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे चारचाकी गाडी शहरातील टिळकनगर येथील संत मुरलीधर मंदिर समोरील रस्त्याच्या कडेला उलटली. सोमवारी दुपारच्या सुमारास या वाहनाचा अपघात झाला. घटनास्थळा जवळील रहिवाशांनी व पोलीस प्रशासनाने पलटी वाहनाला उभे करून जखमींना बाहेर काढून दवाखान्यात दाखल करण्यासाठी मदत केली. यात ३१ जण जखमी झाले असून महिला व बालकांचा यात समावेश आहे.

जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींवर ताबडतोब ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथमोपचार केले. यातील ८ गंभीर जखमी असलेल्यांना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

गंभीर जखमींमध्ये प्रियंका दोनाडकर, प्रमिला भर्रे, रागिना बुराडे, जागृती दोनाडकर, योगिता दोनाडकर, अनुसया राऊत, ज्योत्सना बुराडे, आदेश बुराडे, आदींचा समावेश आहे. गंभीर जखमींवर गडचिरोली येथे जिल्हा रुग्णालयात तर उर्वरीत जखमींवर ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे..

Back to top button