चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन रोखपालास सक्तमजुरी शिक्षा | पुढारी

चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन रोखपालास सक्तमजुरी शिक्षा

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदावर कार्यरत असताना रोखपालाने ३ कोटी ६३ लक्ष, ३९ हजार, ८६० रुपयाचा अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. आता या प्रकरणी आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावून अपहार केलेल्या रक्कमेची नुकसान भरपाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माजी रोखपाल निखील अशोक घाटे असे आरोपीचे नाव आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ऋषीकेश दिपक हिंगणगावकर यांनी हे आदेश दिलेले आहेत.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (जिल्हा परिषद समोर चंद्रपूर) व्यवस्थापक फिर्यादी रजनी संजय सपाटे यांनी, रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून बँकेत रोखपाल या पदावर कार्यरत असलेले आरोपी निखील अशोक घाटे (वय ३८, रा. विठठल मंदीर वार्ड) यांनी पदाचा गैरवापर करुन हा अपहार केला. बँकेतील खातेदारांच्या खात्यातील जमा केलेली रक्कम बँकेच्या रेकॉर्डवर न घेता त्या स्वतःकडे ठेवून खातेदार व बँकेचा विश्वासघात केला. यामध्ये आरोपीविरोधात ६९ लाख ६७ हजार ८०५ रुपयाचा अपहार केल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार रामनगर पोलीस स्टेशन मध्ये कलम ४०९, १०९, २०१, ३४ भादंविचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे करत होते. या गुन्ह्यातील अपहाराची रक्कम तीन कोटी पेक्षा जास्त असल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचेकडे सोपिवण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने विहीत मुदतीत अपहार प्रकरणाचा तपास पुर्ण करुन आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ६ महिन्याच्या मुदतीत या प्रकरणावर देण्याचे निर्देश दिले होते.

Back to top button