शिंदे गटाकडूनही नव्या मित्रपक्षाची चाचपणी; शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग? | पुढारी

शिंदे गटाकडूनही नव्या मित्रपक्षाची चाचपणी; शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग?

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग पुन्हा अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरु आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षात युती होण्याची शक्यता आहे. अकोल्यात तसा प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला. युतीद्वारे ठाकरेंकडून भाजप शिंदे गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू असताना शिंदे गटानेही ठाकरे गटाला प्रतिआव्हान देण्याची तयारी केली असल्याचे समोर येत आहे.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा बाहेर येताच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये युतीबाबत दीर्घ चर्चा झाली. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बोलले जाते.

माध्यमांशी संवाद साधताना जोगेंद्र कवाडे म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा अजेंडा व आमच्या पक्षाची भूमिकाही एकनाथ शिंदेंना सांगितली. त्यावर साधकबाधक चर्चा झाली. त्याला शिंदे यांनी चांगला प्रतिसाद दिला. या चर्चेनुसार आगामी निवडणुकीतील शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र लढणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कवाडे गट, दलित पँथर इतर आंबेडकरी चळवळींना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे. ज्या काँग्रेससोबत आम्ही आघाडी केली, त्यांनी दगाबाजी केल्याचा आरोप कवाडे यांनी यापूर्वीच केला होता.

हेही वाचंलत का?

Back to top button