

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : संकट कधी, केव्हा येईल, हे सांगता येत नाही. मात्र नशीब बलवत्तर असेल, तर संकटाला परतावेच लागते. असेच एक संकट वाघाच्या रूपाने आज ( दि. २४) एका महिलेवर आले. वाघाने त्या महिलेच्या दिशेने उडी घेतली. मात्र, तिच्या जवळ असणार्या महिलांनी आरडाओरड केल्याने वाघाला धूम ठोकावी लागली. रीना हरीदास जांभूळे असे वाघाच्या हल्यातून बचावलेल्या महिलेचे नाव आहे.
या घटनेची हकीकत अशी की, चिमूर तालुक्यातील सध्या कापूस काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महिला सकाळपासून कापूस वेचणीकरीता मजुरीने जातात. तालुक्यातील नेरी येथील काही महिला व पुरूष जांभूळघाट मार्गावरील रामपूर गावाच्या शेतशिवारात शोभा धारणे यांच्या शेतात कापूस काढण्याकरीता गेले होते. सकाळपासून दुपारपर्यंत महिला दूरदूर अंतरावर कापूस काढत होत्या.
या परिसराला जंगल लागून आहे. शिवाय या परिसरात वन्यप्राण्यांचे वावर आहे. दुपारी तीन वाजता रीना हरीदास जांभूळे (वय 35) ही महिला कापूस वेचत असताना या परिसरात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्या महिलेच्या दिशेने उडी घेतली. त्याच क्षणी वाघ आपल्यावर हल्ला करीत असल्याचे तिच्या लक्षात येताच महिला किंचाळली, ओरडली. लगतच्या महिलांनीही त्या महिलेच्या आवाजाने प्रचंड आरडाओरड केल्याने वाघाची भंबेरी उडाली.महिलांच्या आवाजाने वाघही घाबरला. वाघाने त्या महिलेला पंजातून सोडले व जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
वाघाच्या हल्ल्यात रीना जखमी झाल्या आहेत; पण जीवावर बेतलेल्या संकटातून त्या बचावल्या आहेत. या परिसरात कापूस काढणे सुरू असल्याने लगतच्या शेतातील शेतकरी गोळा झाले. त्यांनी वनविभागाल माहिती दिली. नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेला दाखल केले. नेरी वन क्षेत्राचे क्षेत्र सहायक अधिकारी चंद्रकांत रासेकर यांनी रुग्णालयात जावून महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेमुळे शेतकरी, कापूस काढणाऱ्या महिला प्रचंड भयभीत झाल्या आहेत. नेरी रामपूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा :