बुलढाणा : शिवरायांचा अवमान करण्याची स्पर्धा लागली काय? शिंदे गटाच्या आमदाराचा भाजपला सवाल

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवरायांबाबत भाजपा नेत्यांकडून सातत्याने अवमानकारक वक्तव्ये केली जात असल्याने शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राज्यपाल आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्यपाल कोश्यारी, भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, आ.प्रसाद लाड यांच्यात छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची स्पर्धा लागली की काय? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. राज्यपाल व दानवे हे दोघेही आमच्या राजाला एकेरी शब्दात शिवाजी म्हणाले. शिवरायांचा अवमान महाराष्ट्र कधीच सहन करत नाही, असा इशारही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आम्ही शांत राहिलो, पण आता शिवरायांचा अवमान सहन करणार नाही. भाजपा नेत्यांकडून शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्ये केली जात असल्याबाबत मित्रपक्ष शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सोमवारी माध्यमांसमोर येऊन भाजपा नेत्यांना खडेबोल सुनावत संतप्त भावना व्यक्त केल्या.
गायकवाड म्हणाले, शिवरायांचा जन्म कुठे झाला? ते कुठे वाढले हे माहित नसलेल्या भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा जन्म पाकिस्तानात झाला की हिंदूस्थानात? हे तपासावे लागेल. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवरायांचा उल्लेख शिवाजी असा एकेरी शब्दात केल्याने गायकवाड यांनी,”तुम्ही तुमच्या बापाचा उल्लेख एकेरी शब्दात करता काय? असा दानवेंना सवाल केला आहे.
हेही वाचलंत का?
- Shashi Tharoor and PC Chacko : शशी थरुर राष्ट्रवादीचे वाटेवर? पीसी चाको यांनी दिले संकेत
- Aishwarya Sushmita : ‘खाकी : द बिहार चॅप्टर’मधील मिता देवी रिअलमध्ये आहे इतकी ग्लॅमरस
- COVID Man-Made : ‘कोरोना संसर्ग मानव निर्मितच, चीनच्या वुहान लॅबमधून फैलाव’; संशोधकाचा दावा