गडचिरोली : एसबीआय ग्राहक सेवा केंद्रातून ५ लाखांची फसवणूक; दोघांना अटक | पुढारी

गडचिरोली : एसबीआय ग्राहक सेवा केंद्रातून ५ लाखांची फसवणूक; दोघांना अटक

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : कुरखेडा येथील भारतीय स्टेट बँकेने कोरची तालुक्यातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी सुरू केलेल्या ग्राहक सेवा केंद्राद्वारे ग्राहकांची ४ लाख ९५ हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी दोन केंद्र संचालकांना कोरची पोलिसांनी अटक केली आहे. संजित अशोक सरदारे (वय २९,रा. नान्ही, ता. कुरखेडा) आणि वीरेंद्र टेंभुर्णे (रा. कोसमी, ता. कोरची) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

कुरखेडा येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. परंतु, अशी शाखा कोरचीत नसल्याने त्या तालुक्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी बँकेने नागपूर येथील पेपॉईंट इंडिया नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ग्राहक सेवा केंद्रे उघडली. यानंतर केंद्र संचालकांनी बनावट आरडी खाते पासबुक तयार केले. त्यावर बनावट खाते क्रमांक लिहून खातेदारांनी जमा केलेली रक्कम स्वत: जवळ ठेवली. अशाप्रकारे केंद्र संचालकांनी एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांची ग्राहकांची फसवणूक केली.

ही बाब लक्षात येताच पेपॉईंट इंडिया नेटवर्कचे विक्री व्यवस्थापक नंदकिशोर कावळे यांनी कोरची पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी संजित सरदारे व वीरेंद्र टेंभुर्णे यांच्यावर गुन्हे दाखल करुन अटक केली. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.
उपविभाग विभागीय पोलिस अधिकारी महेश झरकर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल फरतडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button