Mobile Ban : ‘या’ गावाने घातला मोबाईलवर बहिष्कार; ग्रामसभेतील मोठा निर्णय | पुढारी

Mobile Ban : 'या' गावाने घातला मोबाईलवर बहिष्कार; ग्रामसभेतील मोठा निर्णय

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : मोबाईलमुळे संपूर्ण जग एका मुठीत आले आहे. माहितीचे भंडार व संवाद क्षेत्रातील चमत्कार म्हणून मोबाइलकडे पाहिले जाते. परंतु माहिती घेण्याऐवजी मनोरंजन आणि गैरवापरासाठीच मोबाइलचा सर्वाधिक वापर होऊ लागला आहे. याचा विपरीत परिणाम बालमनावर होत असल्याचे दिसून येत आहे. यावर आळा घालण्यासाठी बान्शी ग्रामपंचायतीने आता १८ वर्षांखालील मुलांसाठी मोबाइल बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला आहे. यासाठी मुलांसह पालकांचे समुपदेशन करण्यात येणार असून, त्यानंतरही तरुणाईकडून मोबाइलचा वापर न थांबल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे. (Mobile Ban)

मोबाइलचे वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसू लागला. मात्र, मनोरंजन आणि गेमिंगसह इतर गैरप्रकारासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर वाढल्याने चिमुकल्यांसह तरुण पिढीवर विपरित परिणाम होऊ लागला. त्यामुळे पालकांसाठीही मोबाइल ही बाब आता चिंतेची बनली. त्यामुळेच पुसद तालुक्यातील बान्शी ग्रामपंचायतीने थेट ग्रामसभेत ठराव करुन १८ वर्षांखालील मुला-मुलींना मोबाइल वापरण्यास मनाई केली आहे. (Mobile Ban)

अल्पवयीन मुले मोबाइलच्या विळख्यात अडकल्याने त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. मोबाइलच्या गैरप्रकारांसाठी वापर होत असल्याच्या घटना पुढे आल्यानंतर ग्रामस्थांनी १८ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी घालायला हवी, अशी मागणी केली. ही मागणी सरपंच गजानन टाले यांच्यासह सदस्यांनी उचलून धरली. ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मोबाइलचा अतिवापर अडथळा ठरत आहे. मोबाइल वापरावर बंदी घातल्यास विद्यार्थी अभ्यासाकडे वळतील, तसेच पारंपरिक मैदानी खेळामधील रुची पुन्हा या विद्यार्थ्यांमध्ये वाढेल, या हेतूनेच ग्रामपंचायतीने मोबाइल बंदीचा हा ठराव घेतल्याचे सरपंच गजानन टाले आणि उपसरपंच रेखा राठोड यांनी सांगितले.

गावच्या हितासाठीच मोबाइल बंदीचा निर्णय घेतला आहे. या ठरावाची अंमलबजावणी करताना सुरुवातीला अडचणी येतील, मात्र विद्यार्थ्यांसह पालकांचे समुपदेशन करण्यात येईल. त्यानंतरही १८ वर्षांखालील मुलांकडून मोबाइलचा वापर न थांबल्यास दंडात्मक कारवाईसह वाढीव टॅक्स लावण्याचा निर्णय ग्रामसभेत सर्वसंमतीने घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांनी अभ्यासाकडे वळावे हाच या ठरावामागचा उद्देश आहे. मंगळवारी झालेल्या याच ग्रामसभेत गावात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेत निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम उभारण्याचा संकल्पही करण्यात आला.

या ग्रामसभेला ग्रामसचिव पी. आर. आडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष आगलावे, अभय ढोणे, माधव डोंगरे, इंदूताई तांबारे, शोभा आगलावे, मंगल शर्मा, सुनीता लथाड, पंकज बुरकुले, जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक यशवंत देशमुख, आरोग्य उपकेंद्राचे सामुदायिक विकास अधिकारी डॉ. गोरमाळी आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.

हेही वाचा

Back to top button