चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी व्हायलाच हवी : चित्रा वाघ | पुढारी

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी व्हायलाच हवी : चित्रा वाघ

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : दारूची सर्वात जास्त झळ ही स्त्रीयांना बसते. तिचे अवघे आयुष्यच मातीमोल होवून जाते. त्यामुळे दारू वाईटच आहे आणि ती बंद होणे सर्वांसाठीच गरजेचे आहे. एक संवेदनशील नेता म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी या जिल्ह्यात दारूबंदी केली. पुढे काँग्रेसच्या सत्ताकाळात ती सुरू झाली. दारूबंदी हवी अशी येथील काही महिलांची भूमिका आहे, तरी दारू पुन्हा बंद झालीच पाहिजे. या दौऱ्यात माझ्याकडे दारूबाबतीत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्या मी पोलिस अधिक्षकांना देणार आहे. पण चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी व्हावी आणि ती प्रभावी व्हावी अशी मागणीही करणार असल्याचे भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले. चंद्रपूरच्या दौऱ्यावर आलेल्या चित्रा वाघ यांनी एनडी हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष (महानगर) अंजली घोटेकर, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) अल्का आत्राम, वनिता कानडे व अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती होते. याच दरम्यान चित्रा वाघ म्हणाल्या की, महिलांवर अत्याचार करण्याच्या प्रकरणांत सर्वसामान्य आरोपींना शिक्षा होते. पण राजकीय पुढारी किंवा ज्यांची सत्तेत पकड आहे असे आरोपी सुटून जातात. खरे तर, अत्याचार करणारे सारेच आरोपी सारखेच असतात. पण राजकीय धेंडांच्या बाबतीत पाहिजे तसा पाठपुरावा होत नाही. जो कुणी त्यांच्याविरूद्ध लढाई लढतो, त्यांच्याकडे अलिप्ततेने पाहिले जाते. प्रसंगी त्यांचे पाय ओढले जाते. संघटीतपणाचा अभाव अशा आरोपींना अभय देतो. मात्र, न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. ती आहे म्हणून आपण आपल्यापेक्षा ताकदवर लोकांशीही लढा देऊ शकतो.

नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे व फडणवीस गटाने चांगल्या निर्णयांचा झंझावात लावला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व चांगल्या निर्णयांना, योजनांना विशेषत: महिलांबाबतच्या योजनांना तळागळापर्यंत पोहचवणे हे भाजपा महिला मोर्चाचे प्राधान्य असणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताच मी राज्याचा दौरा विदर्भातून सुरू केला. उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. एक मजबूत संघटन तयार करणे हा उद्देश आहे. बुथ ते २५ महिला उभ्या केल्या जाणार आहे. केवळ महिला आहे म्हणून निवडणुकीत उमेदवारी द्या, असे आमचे अजिबात म्हणणे नाही. पण ती महिला निवडणूक जिंकून येण्याचे सारे निकष पूर्ण करीत असेल तर तिला डावलूही नका, अशीच आमची भूमिका असणार आहे.

संजय गांधी निराधार योजनेतून मानधन देण्याची एक तारीख निश्चित असावी, यासाठी महिला मोर्चा प्रयत्न करेल. शासनाकडून हा पैसा यथायोग्य तारखेत येतो पण ते पैसे बँका वापरतात, अशी आमच्याकडे माहिती आहे. ही माहिती तपासून बघितली जाईल आणि खरे असल्यास आम्ही ही माहिती शासनापर्यंत पोहोचवू असे ही चित्रा वाघ म्हणाल्या.

हेही वाचलंत का? 

Back to top button