

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाच्या जाहिरातीत आवडलेली १९६ रुपयांची टी-शर्ट खरेदी करणे. एका व्यक्तीला महागात (Online Frauds) पडले. त्यासाठी त्यांना ५१ हजार ५०० रुपयांचा फटका बसला. ही घटना २९ ऑक्टोबरला बाजोरीयानगर परिसरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटीत घडली. अभिजित दिवाकर खासरे (रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी) असे ऑनलाईन फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, २९ ऑक्टोबरला सकाळी १०.३० च्या सुमारास अभिजित खासरे फेसबुकवर ऑनलाईन (Online Frauds) :सर्फिंग करीत होता. दरम्यान, त्याला १९६ रुपये एवढ्या अल्प किमतीत टी-शर्ट मिळत असल्याची जाहिरात दिसली. टी-शर्ट आवडल्याने त्याने लगेच नोंदणी केली. शिवाय, 'फोन-पे'व्दारे रक्कमही अदा केली. मात्र, टी-शर्ट खरेदीची रक्कम प्राप्त झाल्याचा कुठलाही संदेश अभिजितला आला नाही. त्यामुळे त्याने पुन्हा टी-शर्ट विक्रेत्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन कस्टमर केअरचा क्रमांक घेत संपर्क साधला. तिकडून बोलणाऱ्या भामट्याने टी-शर्टची ऑर्डर कॅन्सल करून अदा केलेली १९६ रुपयांची रक्कम परत बँक खात्यावर मिळावी, यासाठी प्लेस्टोअरमधून एनीडेस्क मोबाईलवर डाऊनलोड करावा लागेल, असे सांगितले.
तेव्हा अभिजितने एनीडेस्क ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड केला. हा ॲप डाऊनलोड होताच 'फोन पे'ला जोडलेल्या दोन्ही अकाऊंटमधून पाचवेळा एकूण ५१ हजार ५०० रुपये काही क्षणातच उडविले. बँक खात्यातून रोख रक्कम काढल्याचे संदेश प्राप्त होताच अभिजितला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने थेट अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून दोन्ही बँकेचे त्याचे अकाऊंट फ्रीज केले. त्यामुळे भामट्याला पुढे रोख काढता आली नाही. मात्र, केवळ १९६ रुपयांच्या टी-शर्टच्या मोहात ५१ हजार ५०० रुपये नाहक बँक खात्यातून गेल्याने अभिजितला मनस्ताप झाला.
हेही वाचलंत का ?