अकोला : पूल ओलांडताना नातू वाहून गेला, नातवाला वाचविण्‍यास गेलेल्‍या आजोबांचाही मृत्यू | पुढारी

अकोला : पूल ओलांडताना नातू वाहून गेला, नातवाला वाचविण्‍यास गेलेल्‍या आजोबांचाही मृत्यू

अकोला; पुढारी वृत्तसेवा : मागील दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. त्यातच मंगळवारी पहाटे अकोट तालुक्यातील तांदुळवाडी येथे मोहाळी नदीचा पूल ओलांडताना आजोबा व नातू वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने तांदूळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर असे की, जिल्हयात मंगळवारी सर्वदूर पाऊस आहे. यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. अकोट तालुक्यातील तांदुळवाडी येथील प्रभाकर प्रल्हाद लावणे (वय 62) हे नातू आदित्य विनोद लावणे (वय 11) याच्यासोबत मंगळवारी सकाळी म्हैस चारण्यासाठी सोनबर्डी येथे गेले होते. आजोबा आणि नातू परतीच्या मार्गावर असताना मोहाळी नदीवरील पूल ओलांडत होते. नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. आजोबाला अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांनी पूलावरून जाण्याचे धाडस केले.

आजोबा आणि नातू दोघेही पूल पार करण्यासाठी घाईत होते. चालताना आजोबांच्या खिशातील तंबाखूची डबी पाण्यात पडली. ती उचलण्याकरिता लहानगा आदित्य माघारी आला. तो डबी उचलीत असतानाच पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली. आदित्य पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जावू लागला. हे काळजाचा ठोका वाढविणारे दृश्य दिसताच. आजोबा प्रभाकर लावणे यांनी आदित्यला वाचविण्याकरिता पाण्यात उडी घेतली; परंतु पाण्याचा प्रवाह जबर असल्याने तेही पुरात वाहू लागले. नदीकाठच्या शेतात असणाऱ्या युवकांनी हे दृश्य बघितले. त्यांनी त्वरेने पुरात उड्या घेऊन प्रभाकर लावणे यांना बाहेर काढले. परंतु उशीर झाला होता. प्रभाकर लावणे यांचा मृतदेह हाती आला. युवकांनी आदित्यला शोधण्याचा खुप प्रयत्न केला. परंतु त्याचा शोध लागू शकला नाही.

नातवाचा शोध सुरु

बचाव व शोध पथकाकडून शोध मोहीम सुरु आहे. महसूल विभाग पोलिसांसह जय भवानी क्रीडा मंडळ पणज, एकलव्य बचाव पथक पोपटखेड, दिनेश बोचे, पांडुरंग तायडे, गावातील युवक व गावकरी मंडळी शोध घेत आहेत. तहसीलदार निलेश मडके, पोलीस निरीक्षक  नितीन देशमुख, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, मंडळ अधिकारी प्रशांत सहारे, तलाठी घुगे, ग्रामसेवक खारोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. शोध कार्य सुरु आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button