अकोला : हर हर शंभो…शंभो शिव महादेवा; कावड उत्सवाला अभूतपूर्व गर्दी | पुढारी

अकोला : हर हर शंभो...शंभो शिव महादेवा; कावड उत्सवाला अभूतपूर्व गर्दी

अकोला; पुढारी वृत्तसेवा : शहराची ओळख बनलेला कावड उत्‍सव श्रावणातील चौथ्या सोमवारी अभूतपूर्व गर्दीत अन् जल्लोषात पार पडला. गांधीग्राम येथून कावडीने पूर्णा नदीचे जल आणून हजारो भरण्यांनी ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यात आला. ‘हर हर शंभो…शंभो शिव महादेवा’ च्या जयघोषाने शहर दणाणून गेले.

अकोलामध्‍ये दरवर्षी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वराला हजारो कावडींनी जलाभिषेक घातला जातो. राजराजेश्वर हे अकोल्याचे दैवत. महादेवाचे जागृतस्थळ. श्रावण महिना हा सर्वांसाठीच उत्साह घेऊन येतो, तसा तो अकोलेकरांसाठीही उत्सवानंद घेऊन येतो. श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याचा अभिषेक पूर्वापार घातला जातो. पूर्णा नदीला परिसरात गंगेइतके महत्त्व आहे. अकोल्यापासून १८ किलोमीटर लांब असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीत ३६५ छोट्या-मोठ्या नद्यांचा संगम असल्याचे सांगितले जाते.

राजराजेश्वराचे जुन्या शहरातील मंदिर हे सुमारे ६०० ते ७०० वर्षे जुने व जागृत असल्याचे मानले जाते. मंदिरातील शिवलिंग खडकात कोरलेले असून या शिवलिंगाला भोपळ्यांच्या कावडीने जलाभिषेक होत होता. हळूहळू हे स्वरुप मावळून अजस्त्र अशा लाकडी बल्लींवर बांधलेल्या हजारो भरण्यांच्या कावडी आता दिसतात. कावड, पालखी उत्सवात अग्रभागी राजराजेश्वर शिवभक्त मंडळाची पालखी होती. त्या पाठोपाठ मानाच्या पालख्या मानकेश्वर, जागृतेश्वर, खोलेश्वर, जागेश्वर, त्रिवेणेश्वर, हरिहरेश्वर, डाबकी रोडवासी, बाभळेश्वर, हरिहर संस्थान, अकोट फाईल, देशमुख फाईल, मोठी उमरी शिवभक्त मंडळ आदींसह अनेक लक्षवेधी पालख्या, कावडींचा समावेश होता.

या मार्गाने आल्या कावड, पालख्या

शिवभक्त कावड, पालखी मंडळे गांधीग्राम येथून पूर्णा नदीचे जल घेवून वल्लभनगर, पाचमोरी, अकोट नाका, शिवाजीपार्क, अकोट स्टॅन्ड, टिळकरोड, मानेक टॉकीज, जुना कापड बाजार, सराफ चौक, गांधी चौक, कोतवाली चौक, लोखंडी पूल, जयहिंद चौक मार्गे वाजत-गाजत जल्लोष करीत पोहोचल्या. त्यानंतर राजेश्वर मंदिराला पाच फे-या मारून जलाभिषेक करण्यात आला. उत्सवातील मोठ्या कावडी म्हणून गणल्या जाणा-या डाबकी रोडवासी तथा हरिहर मित्र मंडळाच्या कावडींना पाहण्यासाठी अकोलेकरांसह आसपासच्या जिल्ह्यातील  भाविकांनीही एकच गर्दी केली होती. डाबकी रोडवासी मंडळाचा शेगावीच्या संत गजानन पालखीचा देखावा यावेळी आकर्षण ठरला.

यंदाच्या उत्सवाची वैशिष्ट्ये

११० पेक्षा अधिक मंडळांचा सहभाग
२० मोठ्या कावडी, ९० पालखी
शेगाव संस्थान पालखी सोहळा देखाव्याचे आकर्षण
४ मोठ्या मंडळांकडून २ हजारावर भरण्यांचा अभिषेक
दिवसभरात ५ हजार भरण्यांचा अभिषेक
महिला कावडधारींचाही सहभाग

बंदोबस्तासाठी १ हजार पोलिस तैनात

कावड उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त होता. राजेश्वर मंदिर ते गांधीग्राम या उत्सव मार्गावर ठिकठिकाणी पोलिस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलिस तैनात होते. तसेच वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता. ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटींग लावले होते. शहर वाहतूक शाखाही कर्तव्य बजावत होती. उत्सवासाठी १ हजार पोलिस अधिकारी, कर्मचा-यांचा बंदोबस्त होता. अकोला शहरच नव्हे तर मूर्तिजापूर, बाळापूर, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी या तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी कावड उत्सवाचे आयोजन झाले. त्यामध्ये शिवभक्तांनी उत्साहात सहभाग नोंदविला.

Back to top button